मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाच्या योजनेबाबत विद्यापीठाद्वारे जाणीवजागृती योजनेबाबत दाखविण्यात आली चित्रफित.
मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाच्या योजनेबाबत विद्यापीठाद्वारे जाणीवजागृती, योजनेबाबत दाखविण्यात आली चित्रफित
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या मार्गदर्शनातून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी असणाऱ्या योजनांची माहिती सांगणारी चित्रफित अमरावती शहर व जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या विविध तालुक्यांमधील महाविद्यालयांमध्ये दाखविण्यात आली. पैशाअभावी मुलींचे शिक्षण थांबू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत घेता येणार आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे मुलींच्या शिक्षणासाठी १०० % अनुदान देण्यात येणार आहे. व्यावसायिक शिक्षण घेताना प्रवेशाच्या वेळी शैक्षणिक संस्थांनी मुलींकडून प्रवेश शुल्क घेवू नये असे या निर्णयात स्पष्ट सांगितले आहे. तसे आदेशही काढण्यात आले आहे. केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या ज्या मुलींच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा मुलींचे संपूर्ण शिक्षण शुल्क शासनामार्फत भरले जाणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आणि इतर मागास वर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना नव्याने प्रवेश घेतलेल्या किंवा पूर्वीच प्रवेश घेतलेल्या मुलींना १०० % शिक्षण शुल्क सवलत मिळणार आहे. पूर्वी मुलींना प्रवेश शुल्क आणि परीक्षा शुल्काचा ५० % लाभ मिळायचा. मात्र मुलींच्या शिक्षणात कोणताही अडथळा येवू नये म्हणून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून १०० % प्रवेश शुल्क आणि परीक्षा शुल्क शासनामार्फत भरले जाणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना मुलींकडून शिक्षण संस्थाकडून कोणत्याही प्रकारचे शिक्षण शुल्क मागू नये याची काळजी शासनाने घेतली आहे. त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे १०० % अनुदान देण्यात येत असल्याने संबंधित व्यावसायिक संस्थांनी विद्यार्थीनीकडून प्रवेशाच्या वेळी शैक्षणिक शुल्काची मागणी करून नये, यासाठी शासनाने १९ जुलै २०२४ रोजी आदेश काढला आहे. संचानलयास्तरावरून तसे सर्व संबंधित शैक्षणिक संस्थाना निर्देश देण्यात आले आहे.
या योजने अंतर्गत विद्यार्थींनीना प्रवेशाच्या वेळी होणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयीन स्तरावर तक्रार निवारण केंद्रही शासनाने सुरु केले आहे. ही योजना उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, औषधी द्रव्य विभाग, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग, मस्त्यव्यवसाय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांमधून राबविण्यात येत आहे. डीबीटी पोर्टलद्वारे विद्यार्थींनीनी योजनेची अर्ज भरण्याची प्रक्रिया २५ जुलै २०२४ पासून सुरु झाली असून अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे मोठ्या प्रमाणातील शिक्षण शुल्क परवडत नाही, म्हणून मुलींचे शिक्षण थांबता कामा नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने ही योजना अंमलात आणली आहे.
वुमेन्स स्टडीज सेंटरला WRC-ICSSR मुंबई यांच्याद्वारे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी Minor Research Project अंतर्गत प्रायोगिक पद्धतीचा उपयोग करण्याच्या दृष्टीने प्रायोगिक कार्यक्रम म्हणून अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ‘सायबर सुरक्षा : जाणीवजागृती’ याविषयावर मुलींसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्यात. यामध्ये पहिली कार्यशाळा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात घेण्यात आली. या कार्यशाळेला अमरावती शहरातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील मुली सहभागी म्हणून होत्या.
अमरावती शहराप्रमाणे जिल्ह्या अंतर्गत विविध तालुक्यातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये सदर कार्यशाळा घेण्यात आल्यात. त्यामध्ये चिखलदरा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चांदूर रेल्वे येथील स्व.श्री मदनगोपालजी मुंधडा कला व वाणिज्य महाविद्यालय, धामणगाव रेल्वे येथील आदर्श विज्ञान, जयरामदास भागचंद कला व बिरसा वाणिज्य महाविद्यालय, मोर्शी येथील भारतीय महाविद्यालय, वरुड येथील महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजार येथील गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अचलपूर येथील जगदंब महाविद्यालय, दर्यापूर येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे संपन्न झाल्यात. या कार्यशाळांना मोठ्या प्रमाणात मुली उपस्थित होत्या. या सर्व कार्यशाळांमध्ये वुमेन्स स्टडीज सेंटरच्या संचालक आणि WRC-ICSSR मुंबई मान्यता प्राप्त संशोधन प्रकल्पाच्या संचालक म्हणून डॉ. वैशाली गुडधे यांनी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी असणाऱ्या योजनांची माहिती सांगणारी चित्रफित दाखवून त्याबाबत मार्गदर्शन केले. या सर्व कार्यशाळांना महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.