मोठी बातमी! अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, निलेश लंकेंच्या पत्नीविरुद्ध उमेदवार ठरला
गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांत जागावाटपाचं गुऱ्हाळ चालू आहे. या दोन्ही आघाड्यांत जागावाटपाचा नेमका फॉर्म्यूला अद्याप समोर आलेला नाही. ज्या-ज्या जागांवर तोडगा निघालेला आहे, त्या-त्या जागांवर वेगवेगळे पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या पक्षाने नुकतेच आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण चार मतदारसंघांसाठी अजित पवार यांनी आपले उमेदवार दिले आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिसरी यादी
गेवराई – विजयसिंह पंडित
फलटण- सचिन पाटील
निफाड – दिलीपकाका बनकर
पारनेर – काशिनाथ दाते
नाशिकच्या निफाडमध्ये पुन्हा दिलीपकाका यांना संधी
नाशिकच्या निफाड पिंपळगाव मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीपकाका बनकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलीप बनकर यांच्यावरच दुसऱ्यांदा विश्वास विश्वास ठेवला आहे. भाजपाचे यतीन कदम यांनीदेखील या जागेवर दावा केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी या जागेनिमित्त अजित पवार यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असेल याबाबत चर्चा चालू होती. आता मात्र निफाड या जागेसाठी अजित पवार यांच्या पक्षाचे दिलीप पाटील हेच उमेदवार असणार आहेत.
निलेश लंकेंच्या पत्नीविरुद्ध उमेदवार ठरला
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून परनेर या मतदारसंघासाठी खासदार निलेश लंके यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे निलेश लंके तसेच त्यांच्या पत्नी राणी लंके यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. महायुतीकडून मात्र या जागेवर अद्याप उमेदवार ठरला नव्हता. दरम्यान, आता अजित पवार यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पारनेर या जागेसाठी उमेदवार देण्यात आला आहे. येथून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काशीनाथ दाते हे निवडणूक लढवणार आहेत. म्हणजेच या जागेवर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात थेट लढत होणार आहे.