जिल्हाधिकारी यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाहणी दौरा
अमरावती, दि. 30 (जिमाका): जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नुकताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथे पाहणी व निरीक्षण दौरा केला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन), जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत, मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह, ग्रंथालय, व्याख्यान गृह इत्यादींची प्रत्यक्ष पाहणी केली. दौऱ्यादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी यांनी इर्विन व डफरीन येथील वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र कक्ष, इर्विन येथे नवीन तयार होणारे ह्दययरोग अतिदक्षता विभाग या इमारतींना भेट देऊन आवश्यक सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर डफरिन रुग्णालय येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक इमारत, व्याख्यानकक्ष, ग्रंथालय, वसतिगृहे इत्यादी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली .व तेथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांबाबत आढावा घेतला.
जिल्हाधिकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक असलेल्या बाबींचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना तसेच इतर उपलब्ध निधीतून आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले. अमरावती येथे सुसज्ज कम्प्युटराइज व्याख्यान कक्ष, मायनर ओटी येथील सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता श्री. गिरी, उप अभियंता बांधकाम विभाग श्री. काळे, आरोग्य विभागाचे उप अधिष्ठाता डॉ. नितीन अंभोरे, प्रशासकीय अधिकारी संजय मैदानकर, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, जिल्हा स्त्री रुग्णालय डफरिन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार आदी यावेळी उपस्थित होते.