परवानगी, तक्रारींचा निपटारा तातडीने करावा *निवडणूक निरीक्षकांच्या सूचना
अमरावती, दि. 30 (जिमाका) : निवडणुकीतील प्रत्येक उमेदवारांना सहकार्य करावे. त्यांना प्रचारासाठी आवश्यक असलेली परवानगी तातडीने देण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी एक खिडकी कार्यान्वित करण्यात यावी. परवानगी, तसेच तक्रारींचा निपटारा तातडीने करावा, अशा सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या चारही सामान्य निरीक्षकांनी आज आढावा घेतला. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक रवि रंजन कुमार विक्रम, श्याम लाल पुनिया, लक्ष्मीशा जी, बिधानचंद्र चौधरी यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्रा, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक यांनी मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करण्यात याव्यात. प्रामुख्याने उमेदवारांना देण्यात येणाऱ्या विविध परवानगीसाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. उमेदवारांना प्रचाराची परवानगी सुलभरित्या मिळाल्यास ते खर्चही व्यवस्थित देतील. मतदानासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी कमी मतदान असलेल्या आणि शहरी भागामध्ये जनजागृतीचे अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना केल्यात.
बैठकीत जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाची माहिती दिली. प्रामुख्याने मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा जंगल आणि रिमोट असल्याने यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. येथील सर्व मतदान केंद्र पर्यायी व्यवस्थेने संपर्कात राहतील, याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदार यादी अंतिम करण्यात येत असून नव्याने गेल्या कालावधीत एक लाखाहून अधिक नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदानासाठी पुरेशा प्रमाणात ईव्हीएम मशीन्स उपलब्ध असून त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहे.
मतदानावरील बहिष्काराची अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. परंतु जिल्हा प्रशासन यावर पूर्ण लक्ष ठेऊन आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या भागात स्वीपचे उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या लोकसभेच्या मतदानात तीन टक्के वाढ झाली आहे. नियंत्रण कक्ष, स्ट्राँगरूम सुसज्ज आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी आणि परवानगीसाठी जिल्हास्तरावर सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना कोणताही त्रास होणार नाही. निवडणूक निरीक्षकांची माहिती आणि संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक त्यांच्या समस्यांबद्दल थेट संपर्क साधू शकतील, असेही श्री. कटियार यांनी सांगितले.