साखरकर यांनी विद्यापीठाला प्रदिर्घ सेवा दिली – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश साखरकर यांचा सेवानिवृत्तीप्रसंगी उभयता सत्कार
अमरावती – (दि. 30.10.2024) सेवानिवृत्त कर्मचारी श्री साखरकर यांनी विद्यापीठाला प्रदीर्घ सेवा दिली आहे. दैनिक वेतनिक म्हणून त्यांनी विद्यापीठात सुरुवात केली. महाविद्यालयीन विभागात प्रदीर्घ कार्य करुन आता आचार्य कक्षात ते आहेत. महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी यांचे कल्याणाकरीता त्यांनी विद्यापीठाला दिलेली सेवा निश्चितच वाखाणण्याजोगी आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील श्री सुरेश साखरकर यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून व्य. प. सदस्य डॉ. आर. डी. सिकची, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नियंत्रण अधिकारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, सत्कारमूर्ती श्री सुरेश साखरकर, सौ. साखरकर उपस्थित होते.
कुलगुरू पुढे म्हणाले, विद्यापीठात संख्येने कर्मचारी कमी असून, भविष्यात कंत्राटी पध्दतीने भरतीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच कार्यपूर्ती होईल, असे सांगून त्यांनी श्री सुरेश साखरकर यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी श्री सुरेश साखरकर यांचा शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवप्रमाणपत्र देऊन तसेच सौ. साखरकर यांचा सौ. मोनाली तोटे पाटील यांनी साडीचोळी, कुंकवाचा करंडा देऊन सत्कार केला.
प्रमुख अतिथी डॉ. आर. डी. सिकची म्हणाले, मी जेव्हा शिक्षक म्हणून रुजू झालो, तेव्हापासून साखरकर यांना ओळखतो. कार्यतत्परता, नियमाची जाण हे त्यांच्या कार्याची वैशिष्ट¬े आहेत. सेवानिवृत्त होणा-या कर्माचा-यांना शेवटच्या दिवशी नियमानुसार देय असलेले सर्व लाभ मिळालेच पाहिजे, यावर माझा सदैव भर राहिला आहे, असे सांगून त्यांनी सत्कारमूर्तीं श्री सुरेश साखरकर यांना पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी सत्कारमूर्ती श्री सुरेश साखरकर यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगतांना सहकारी कर्मचा-यांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. नियंत्रण अधिकारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, श्री अजय देशमुख यांनीही मनोगतातून श्री सुरेश साखरकर यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष श्री मंगेश वरखेडे व डॉ. साक्षी ठाकुर यांनी सत्कारमूर्तीं श्री सुरेश साखरकर यांना भागभांडवलाचा धनादेश देऊन सत्कार केला. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी, तर आभार अधीक्षक श्री धनंजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.