हृदयात रक्ताची गुठळी, प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांना छातीदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हृदयात रक्ताची गाठ झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना वंचित बहुजन आघाडीसाठी मोठा हादरा मानला जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांना कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांमध्ये आदराने बाळासाहेब असेही संबोधले जाते. “बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे” अशी माहिती वंचित बहुजन आघाडीने ‘एक्स’ या सोशल मीडियावरील अकाऊण्टद्वारे दिली आहे.
https://x.com/VBAforIndia/status/1851870778150535340
बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काही तासात त्यांची अँजिओग्राफी केली जाणार आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या बातमीमुळे वंचितचे कार्यकर्ते आणि समर्थक चिंतित आहेत. आंबेडकर कुटुंब यावेळी कुणाच्याही प्रश्नांना सामोरी जाणार नाही. आपणास विनंती आहे, की कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, कारण ते सध्या कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत, असे आवाहनही वंचितने केले आहे. पुढील तीन ते पाच दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार असल्याने, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर या निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहितीही ट्विटद्वारे देण्यात आली आहे. बाळासाहेबांना तुमच्या विचारांत ठेवा आणि ते लवकर बरे व्हावे ही प्रार्थना करा, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर यांना पूर्वीही हृदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांनी राजकारणातून ब्रेक घेतला होता.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीत प्रवेशाच्या चर्चा फोल ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुकांना सामोरी गेली होती. यंदाही वंचित स्वबळावर विधानसभेच्या रिंगणात उतरली आहे. दहा उमेदवार याद्यांमधून पक्षाने अनेक जणांना तिकीट दिले आहे. ते पूर्ण जोमाने निवडणुकांच्या तयारीला लागले असतानाच सर्वेसर्वा बाळासाहेबांच्या प्रकृतीमुळे पक्षाला धक्का बसला आहे.