निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे -निवडणूक निरीक्षक श्यामलाल पुनिया
अमरावती : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर आता प्रचार सुरू होणार आहे. उमेदवारांनी निवडणूक कालावधीत प्रचार करताना आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अमरावती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक श्यामलाल पुनिया यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची बैठक नवीन तहसिल कार्यालयात घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
श्री. पुनिया यांनी, निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन केले. चिन्ह वाटप करण्यात आल्यानंतर उमेदवारांना प्रचार करावा लागणार आहे. मात्र प्रचार करताना सर्व परवानगी घेऊन करावा. यासाठी मार्गदर्शक पुस्तिकाही देण्यात येणार आहे. उमेदवार अंतिम झाल्यानंतर प्रत्यक्ष मतपत्रिका कशी राहणार आहे, याचाही नमुना देण्यात येणार आहे. निवडणूक पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. निवडणुकीमध्ये प्रतिनिधी नेमताना त्यांना योग्य माहिती देण्यात यावी. त्यामुळे चुकीची माहितीवर प्रतिबंध घातल्या जाईल.
निवडणुकीत 50 टक्के मतदान केंद्रांचे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार आहे. तसेच गृहमतदानाच्या प्रक्रियेमध्ये सर्व उमेदवारांनी उपस्थिती दर्शवावी. अमरावतीच्या निवडणुकीत 22 उमेदवार असल्याने दोन मतदान यंत्र राहणार आहे. मतदान प्रक्रियेबाबत उमेदवारांना वेळोवेळी सर्व माहिती उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. उमेदवारांना निवडणुकीसाठ 40 लाख रूपयांची मर्यादा असून या मर्यादेत खर्च करावा लागणार आहे. निवडणूकीत होणारा खर्च पथकास सादर करावा. तसेच मतदारांना कोणतेही प्रलोभने देण्यात येऊ नये. मतदारांनी मतदानासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी उमेदवारांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
यावेळी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या शंकाचे निरासन करण्यात आले. तसेच खर्च विषयक बाबींची माहिती देण्यासाठी व्यक्तिश: मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.