मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविणार -मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र
*8 ते 19 नोव्हेंबरपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन
*प्रत्येक तालुक्यात दोन मोठे कार्यक्रम घेणार
अमरावती, दि. 6 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदार जनजागृतीसाठी स्वीपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात दि. 8 नोव्हेंबरपासून कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. याचे तालुकास्तरावर नियोजन करण्यात यावे, तसेच या आठ दिवसांच्या कालावधीत प्रत्येक तालुक्यात दोन मोठे कार्यक्रम घ्यावेत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी दिले.
स्वीप उपक्रमांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा आज घेण्यात आला. श्रीमती महापात्र यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
श्रीमती महापात्र यांनी, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत पिंक फोर्स तयार करण्यात आली होती. यावेळी महिलांनी सक्रीय सहभाग नोंदवावा. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, उमेद आणि बचतगटांच्या महिलांनी घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करावे. यावर्षी अंगणवाडी सेविका महिला बचतगटाचे चर्चासत्र घेणार आहे. सदर चर्चासत्र हे सायंकाळच्या वेळेत घेण्यात यावे. पिंकफोर्सच्या माध्यमातून गृहभेटी करण्यात याव्यात.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदानाची टक्केवारी कमी नोंदवली गेली आहे, अशा भागावर लक्ष केंद्रीत करावयाचे आहे. यावेळी महिलांचे मतदान होण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात महिलांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. महिलांच्या सहभागाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत होणार आहे. यावेळी 80 टक्के मतदानाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात दोन मोठे उपक्रम राबविण्यात येणार आहे, तसेच आठवडाभरात राबवावयाच्या कार्यक्रमाचे नियोजन तातडीने करण्यात यावे. यावेळी दि. 16 नोव्हेंबर रोजी सर्व तालुक्याच्या ठिकाणी रॅली काढण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.