LIVE STREAM

Latest NewsMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024

जिल्हाधिकाऱ्यांनी केली विविध मतदान केंद्राची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वोटर स्लिप चे नागरिकांना वाटप

अमरावती, दि . 8 (जिमाका) :  विधानसभा  सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते  आज नागरिकांना वोटर स्लिप  व गुलाबपुष्प देवून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी ‘आम्ही मतदानाचा हक्क निश्चित बजावू व राष्ट्रीय कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेवू’, अशी ग्वाही दिली

    जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी आज अमरावती तसेच बडनेरा येथील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव  आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

       निवडणूक प्रक्रियेत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय राखावा. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध असल्याची खात्री उपविभागीय अधिकारी यांनी करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिले .

            मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था, आवश्यक असेल तिथे पेंडॉल, स्वच्छतागृहे या मूलभूत  सोयी-सुविधा असणे आवश्यक आहे. मतदान करतेवेळी त्या कक्षामध्ये चांगला प्रकाशझोत असावा. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन, मतदार संख्या आणि होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीबाबत तात्काळ अद्ययावत माहिती अपलोड करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

            जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जुनी वस्ती, बडनेरा येथील अमरावती मनपा उर्दू प्राथमिक कन्या शाळा क्रमांक -3,  साईनगर येथील साईबाबा विद्यालय, हलिमा उर्दू शाळा, बिस्मिल्ला नगर येथील मनपा उर्दू प्राथमिक शाळा, जमील कॉलनी येथील मनपा उर्दू हायस्कूल, छत्रसालगंज येथील मनपा हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक -2, वलगाव रोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्योचित ॲकेडेमीक माध्यमिक शाळा या मतदान केंद्रांना भेट देऊन तेथे व्यवस्थेची पाहणी केली.

     ‘मी मतदान करणारच’ या सेल्फी पॉईंटवर जिल्हाधिकारी तसेच सर्व मान्यवर यांनी सेल्फी काढून मतदानाचा हक्क बजावण्याबाबत  नागरिकांना आवाहन केले.  पोलीस आयुक्त श्री. रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती मोहपात्र, मनपा आयुक्त श्री कलंत्रे यांनीही यावेळी  नागरिकांना मतदानाचा हक्क बजावून  राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, आम्हीही करतो, तुम्हीही मतदान करा, असा संदेश दिला. यावेळी नागरिकांनी  मतदानाचा हक्क बजावण्याबाबत प्रतिज्ञा घेतली.  चांदणी चौक ते राजकमल चौक या मार्गाने मतदानाबाबत जनजागृती करणारी रॅली यावेळी काढण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!