LIVE STREAM

AmravatiLatest News

महासंघाच्या शिष्टमंडळासोबत कुलगुरूंची धडक पाहणी – सायकलींच्या दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी

अमरावती विद्यापीठात दिव्यांगांच्या स्वयंचलित तीन चाकी ई-सायकली न वापरता धूळखात आणि दुचाकी सायकलींची दयनीय स्थिती, शिक्षक कल्याण योजना अद्याप सुरू नाही – शैक्षिक महासंघाचा आक्रोश

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांची भेट घेतली. विद्यापीठ प्रशासनातील अक्षम्य दिरंगाई आणि संथ कारभार उघड करणाऱ्या मुद्द्यांवर कुलगुरूंचे लक्ष वेधण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उद्दिष्टांत संत गाडगेबाबांच्या विचारांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. याच अंतर्गत, २०१७ ते २०२२ कालावधीत महासंघाच्या प्रेरणेतून आणि व्यवस्थापन सदस्य प्रा. प्रदीप खेडकर यांच्या मार्गदर्शनात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रफुल्ल गवई यांनी दिव्यांगांसाठी स्वयंचलित तीन चाकी सायकली उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव एकमताने मंजूर होऊन सुमारे अडीच वर्षांपूर्वी ३ लाख रुपये खर्च करून ई-सायकलीची खरेदी करण्यात आली. परंतु गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपण्याची जबाबदारी असणाऱ्या विद्यापीठात या सायकली अद्यापही प्रत्यक्ष वापरात आणल्या गेल्या नाहीत आणि दिव्यांगांसाठी उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. वनस्पतीशास्त्र विभागात कंपनीकडून आलेल्या पॅकिंगसह धुळीखात पडून असल्याची माहिती महासंघाने कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. विद्यापीठ प्रशासनाच्या अनास्थेबाबत महासंघाने चीड व्यक्त केली, ज्यावर कुलगुरूंनी तात्काळ या सायकली पडून असलेल्या वनस्पतीशास्त्र विभागात प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला आणि धडक भेट दिली. पाहणीत सायकलींची दुरावस्था समोर आली. इलेक्ट्रिक सायकलींसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या बॅटरी गायब असल्याचे देखील निदर्शनास आले. प्रत्यक्ष स्थिती पाहून आक्रोश व्यक्त करीत महासंघाच्या शिष्टमंडळाने या अक्षम्य दिरंगाईसाठी जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. माननीय कुलगुरूंनी देखील जबाबदारी टाळण्याचा हा प्रकार असल्याची भावना व्यक्त करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

तसेच, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या विशेष प्रयत्नाने पी. व्ही. इंडस्ट्रीज, जाम, वर्धा यांच्या कडून CSR फंड प्राप्त झाला होता. या माध्यमातून एकूण ५५ सायकली विकत घेण्यात आल्या होत्या. “संत गाडगेबाबा सायकल योजना” अंतर्गत सदर सायकलींच्या वापराबाबत विनियम १०/२०१९ मध्ये नियमावली तयार करून हि योजना प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी विद्यार्थी विकास मंडळाकडे सोपविण्यात आली. सद्यस्थितीत बहुसंख्य सायकली नादुरुस्त अवस्थेत खितपत पडून असल्याची बाब महासंघाने कुलगुरूंना लक्षात आणून दिली. या सायकलींच्या दुरुस्तीसाठी वार्षिक निधी तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने राखीव केलेला असून देखील आज ही अवस्था का झाली, असा सवाल महासंघाने उपस्थित केला. माननीय कुलगुरूंनी सांगितले की, विद्यार्थी विकास मंडळाने १.० लाख रुपयांची सायकल दुरुस्तीसाठी मागणी केली असताना, व्यवस्थापन परिषदेने या योजनेसाठी हा खर्च जास्त असल्याचे सांगून फक्त ४० हजार रुपये मंजूर केले. या रकमेत कोणताही ठेकेदार सायकली दुरुस्त करण्यास पुढे आला नाही, परिणामी सायकली नादुरुस्त अस्वस्थेत पडून असल्याची बाब समोर आली. मा. कुलगुरूंनी या बाबतीत अधिक चौकशी करून ही योजना अधिक जोमाने राबविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

विद्यापीठात मूल्यांकन कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या दाननिधीची मोठी रक्कम शिक्षक कल्याण निधी म्हणून दरवर्षी जमा होत असते. या निधीतून विद्यापीठ परिसरात तसेच संलग्नित महाविद्यालयात कार्यरत तसेच प्रशासकीय कामासाठी विद्यापीठ परिसरात आलेल्या प्राध्यापकांच्या दुर्दैवी निधनाच्या प्रसंगी, मोठ्या आजाराच्या औषधोपचारासाठी किंवा आणीबाणीच्या प्रसंगी साहाय्य मिळणे अपेक्षित आहे. परंतु तशी योजना अस्तित्वातच नसल्याने मदत करणे शक्य झाले नव्हते.  हि बाब लक्षात घेता, अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने संवेदनशीलतेने विचार करून शिक्षक कल्याण योजना प्रस्तावित केली होती. तत्कालीन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनात, माजी व्य.प.सदस्य डॉ. प्रफुल्ल गवई यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य डॉ. नंदकिशोर ठाकरे, प्राचार्य डॉ. मिनल ठाकरे, डॉ. संतोष कुटे, डॉ. सुभाष गांवडे यांच्या सहभागाने शिक्षक हिताची योजना तयार करण्यात आली होती. ह्या समितीच्या अनेक बैठकीनंतर अर्ज व आवश्यक दस्तऐवजांसह विस्तृत अहवाल समिती सचिव डॉ. नितीन कोळी यांच्या माध्यमातून मा. कुलगुरूना सोपवण्यात आला होता. यामध्ये नियमित शिक्षकांसोबतच, तासिका तत्वावर आणि तदर्थ स्वरुपात कार्यरत प्राध्यापकांना देखील लाभ मिळावा यासाठी योजना तयार करण्यात आली होती. गंभीर आजारासाठी कर्ज, मुलांसाठी शैक्षणिक कर्ज, पेटंटसाठी प्रोत्साहनपर रक्कम, संशोधनासाठी विविध योजना, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमांचा समावेश होता. मुल्यांकन केंद्रावर कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या ५% रकमेची कपात करून आजतागायत जवळपास जमा निधीवरील व्याजातून शिक्षक कल्याण योजना राबविण्यात यावी अशी तत्कालीन व्यवस्थापन परिषद सदस्यांची भावना होती. महासंघाने या योजनेची देखील अद्याप अंमलबजावणी न झाल्याचे कुलगुरूंच्या लक्षात आणून दिले.

मा. कुलगुरू महोदयांनी सर्व प्रकरणांची नोंद घेऊन संबंधित विभागाकडून माहिती मागवून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मा. कुलगुरू डॉ. मिलिंदजी बारहाते यांनी सर्व मुद्द्यांना गांभीर्याने घेऊन तात्काळ परिस्थिती जाणून घेण्यासाठी कार्यालय सोडून बाहेर पडल्याबद्दल महासंघाने त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या प्रती आभार व्यक्त केले. महासंघाच्या शिष्टमंडळात प्राचार्य डॉ. नंदकिशोर ठाकरे, प्राचार्य डॉ. डी. टी. इंगोले, प्रा. डॉ. दिनेश खेडकर, प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, आणि प्रा. डॉ. प्रफुल्ल गवई हे प्रमुख उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!