महोत्सव विदर्भाचा- विदर्भाच्या पुरातन राजधानीचा नामक ”अंबा-रुख्मिणी महोत्सव २०२४” ची पहिली बैठक संपन्न
कौंडण्यपूरच्या कार्तिक मास यात्रेमध्ये यावर्षीही रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी
२९ नोव्हेंबर रोजी नयनरम्य भव्य ”बोटिंग शो” चे विशेष आकर्षण
कौंडण्यपूर (अक्षय पुंडेकर) दिनांक ११ नोव्हेंबर: विदर्भाची पुरातन राजधानी, माता रुक्मिणीचे माहेरघर, कुलस्वामिनी अंबिका मातेचे शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील कार्तिक मास यात्रा प्रारंभ होत असून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा या यात्रेमध्ये विदर्भातील अनेक सुप्रसिद्ध कलाकार तसेच सिने अभिनेते व संगीत, क्रीडा, साहित्य, तसेच सामाजिक, शैक्षणिक, अशा सर्वच क्षेत्रातील रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी घेऊन येणाऱ्या ”महोत्सव विदर्भाचा, विदर्भाच्या पुरातन राजधानीचा” नामक ”अंबा-रुख्मिणी महोत्सव-२०२४” ची पहिली बैठक सोमवार दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४ रोजी श्री अंबिका देवी मंदिर मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये सर्वप्रथम यावर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली. आगामी २९, ३० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उत्सव समितीच्या सभासदांकडून यावर्षी काही नवीन उपक्रम आयोजित करण्याचे सुद्धा ठरविले आहे. ज्यामध्ये २९ नोव्हेंबर रोजी वर्धा नदीपात्रात नयनरम्य अशा भव्य ”बोटिंग शो” चे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये आकर्षक फुलांची सजावट व दिव्यांची आरास याचे सुद्धा मुख्य आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर राज्यस्तरीय भव्य एकता मॅरेथॉन स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात येणार असून विजेता स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे सुद्धा वितरित करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, त्याचबरोबर भव्य महाआरोग्य व रोगनिदान शिबीराचे सुद्धा आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये ७५ तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून या शिबिरात ज्या रुग्णांची तपासणी केली जाईल त्यापैकी ज्यांना शस्त्रक्रिया करायची आहे, त्यांची मोफत शस्त्रक्रिया नागपूर येथील उच्च दर्जाचे रुग्णालय म्हणून ओळखले जाणारे स्व. शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या जाण्याची, राहण्याची आणि खाण्याची सुद्धा मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अक्षय पुंडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाची रूपरेषा श्री गजाननराव बांबल यांनी आपल्या संचालनातून सर्वाना सांगितली. या बैठकीला दिपकराव जुमडे, अंकुशराव देऊळकर, बाळूभाऊ ठाकरे, अमोल पुंडेकर, मैताब शाह, निखिल ठाकरे, अंकुश पुंडेकर, रोहित धवणे, प्रयास भाकरे, प्रतीक कदम, वैभव हेटे, सार्थक कदम, वेदांत वानखडे, कृष्णा ठाकरे, दक्ष खंडारे यांच्या उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*कौंडण्यपूर येथे भव्य कॉरिडॉर ची निर्मिती आणि अंबा-रुख्मिणी महोत्सवचे राज्यस्तरीय आयोजन करण्याचा आमचा संकल्प: रविराज देशमुख*
माता रुख्मिणीचे माहेरघर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे पर्यटनाच्या दृष्टीने भव्य कॉरिडॉर व रुख्मिणी साडी हा ब्रँड जगभरात पोहोचविण्यासाठी आमचे मिशन सुरु असून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा महोत्सव विदर्भाचा, विदर्भाच्या पुरातन राजधानीचा नामक अंबा रुख्मिणी महोत्सव हा यावर्षी सुद्धा मोठ्या जल्लोषात आम्ही साजरा करणार असून पुढील काळात हा महोत्सव राज्यस्तरावर आयोजित करण्याचा आमचा संकल्प आहे. यावर्षीच्या महोत्सवामध्ये विविध रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली असून भव्य महाआरोग्य व रोगनिदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. अंबा रुख्मिणी महोत्सव मध्ये दरवर्षी हि मोफत आरोग्य सेवा आम्ही सुरु ठेवणार आहे, तरी या सर्व सुविधा व कार्यक्रमांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, तसेच ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी केले आहे.