मतदान कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी विशेष उपक्रम राबविणार -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि. 13 : अमरावती विभागातील मतदान कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि समर्थ वातावरणाची अनुभूती व्हावी तसेच निवडणूक प्रक्रियेतील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाचा सन्मान व्हावा, यासाठी सर्व मतदान केंद्रावर अनुषंगिक सर्वोत्तम सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले. हे काम काटेकोरपणे होण्यासाठी विभागात विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी जिल्हास्तरावर एका नोडल ऑफीसरची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र व अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मतदान कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, कार्यक्षमता व सुविधा पुरविण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.
डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर नियुक्त मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सक्षम व सर्व सोयीयुक्त वातावरण लाभण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधांची तजवीज करुन ठेवावी. यासाठी विभागात विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांसाठी निवास, स्वच्छ-शुध्द पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सुविधा पुरविण्यात येईल. मतदान कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक समस्या उद्भवल्यास त्यावर तत्काळ औषधोपचारासाठी महत्वाच्या ठिकाणी वैद्यकीय पथके व रुग्णवाहीका तैनात असतील. संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात मतदान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीसांची विशेष सुरक्षा व्यवस्था केली जाईल, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले. तसेच उपरोक्त बाबी संदर्भात जिल्हानिहाय आढावा घेण्याच्या सूचना दिल्या .
निवडणुकीच्या कामासाठी मतदान कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन व चांगले काम करणा करणाऱ्या कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देण्याची व्यवस्था निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करावी अशा सूचना देण्यात आल्या. सदर उपक्रमाच्या माध्यमातून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, महिला व दिव्यांग मतदान केंद्रे तसेच युवा मतदान केंद्र व दुर्गम भागात निवडणुकीचे कामकाज यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येतील, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान कर्मचाऱ्यांच्या कल्याण व सुविधा (PPWF) कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. मतदान कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात यावा. व त्याकरिता वेगळ्या संपर्क अधिकारी यांची नेमणूक करावी ,मतदान कर्मचाऱ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस प्रणाली सुसज्ज ठेवण्यात यावी, जेणेकरून वास्तविक-वेळ ट्रॅकिंगद्वारे सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापन सुलभ होईल. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, बसण्याची सोय यासारख्या आवश्यक सुविधा प्राथम्याने पुरवाव्यात तसेच मतदानाच्या दिवसापूर्वी मुलभूत सुविधा उपलब्धतेची तपासणी करुन खात्री करावी. मतदान कर्मचाऱ्यांसाठी नियोजित सुविधा व कल्याणकारी उपक्रमांची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान कर्मचाऱ्यांना साहित्य वाटपाच्या वेळी द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी बैठकीत दिल्या.
सदर बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या नियोजन व कार्यवाहीची माहिती संबंधित जिल्ह्यांच्या नोडल अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याच्या सूचनाही सदर बैठकीत देण्यात आल्या .