विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. वंदन मोहोड यांच्या मातोश्री श्रीमती विमलाबाई मोहोड यांचे मरणोत्तर देहदान
अमरावती शहरातील प्रतिष्ठीत नागरिक तथा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. वंदन मोहोड यांच्या मातोश्री श्रीमती विमलाबाई मोहोड यांचे नुकतेच 12 नोव्हेंबर, 2024 रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. मोहोड कुटुंबियांनी केलेल्या संकल्पानुसार आपल्या मातोश्री स्व. विमलाबाई मोहोड यांचे मरणोत्तर नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) या ठिकाणी देहदान करुन आपला संकल्प पूर्ण केला.
वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्याथ्र्यांना मानवी शरीराचा अभ्यास करण्यासाठी मनुष्य देहाची रचना, शरीराचे चालणारे कार्य, अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया करतांना शरीरातील अवयवांबद्दल माहिती असावी, यासाठी मनुष्यदेहाची नितांत गरज असते, परंतु मानवी शरीरच उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी सुध्दा येतात. अशातच डॉ. वंदन मोहोड यांच्या कुटुंबियांनी सुध्दा श्रीमती विमलाबाई मोहोड यांच्या मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता व तो त्यांनी अखेर पूर्ण केला.
दिनांक 12 नोव्हेंबर रोजी श्रीमती विमलाबाई मोहोड यांचे वृध्दापकाळाने निधन झाल्यानंतर मुले डॉ. वंदन, श्री नंदन व श्री चंदन मोहोड यांनी नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) च्या विद्याथ्र्यांना मानवी शरीराचा अभ्यास करता यावा, यादृष्टीने श्रीमती स्व. विमलाबाई मोहोड यांच्या देहदानाचा निर्णय घेतला व मृतदेह नागपूर येथील नंदन मोहोड यांच्या घरुन रुग्णालय प्रशासनाच्या स्वाधीन केला. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडूनही मोहोड कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले.
वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्याथ्र्यांना भविष्यात मनुष्याला होणा-या विविध प्रकारच्या आजारांवर औषधोपचार करावा लागतो. त्यामुळे मानवी शरीराचा अभ्यासही तितकाच आवश्यक असतो. दुर्दैवाने मानवी देह उपलब्ध नसल्याने अनेक समस्या येतात. ही बाब ओळखून मोहोड कुटुंबियांनी आपल्या मातोश्री श्रीमती विमलाबाई मोहोड यांच्या मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता. सामाजिक दायित्व पार पाडत असतांना अशा प्रकारचे समाजोपयोगी निर्णय देखील घ्यावे लागतात, जेणेकरुन समाज अशा कार्यापासून प्रेरणा घेऊन ते कार्य पुढे नेतील. श्रीमती स्व. विमलाबाई मोहोड यांच्या मरणोत्तर देहदानाचा संकल्प सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.