महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाकरिता मतदान करा कन्हैया कुमार यांचे जनतेला भावनिक आवाहन
यशोमती ठाकूर यांचा फायटर महिला म्हणून उल्लेख
नेरपिंगळाई येथील जाहीर सभेत विरोधकांचा घेतला समाचार
अमरावती : संतांची भूमी असलेल्या राज्यात गद्दारांनी आमदारांना विकत घेऊन सत्ता परिवर्तन केले. मात्र हे सर्वसामान्यांना पचनी पडले नाही.देशातील जनता हा बदला घेण्यासाठी व्याकुळ आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाकरिता आपण सर्वांनी महाविकास आघाडीचे उमेदवारांना मतदान करावं असे भावनिक आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय युवा नेते कन्हैया कुमार यांनी केले.
नेरपिंगळाई येथील जाहीर सभेत कन्हैया कुमार बोलत होते. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यशोमती ताई ठाकूर यांच्या प्रचारार्थ नेर पिंगळई येथे कन्हैया कुमार यांची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना कन्हैया कुमार म्हणाले की,महिलांना राजकारण करणे सोपे नाही. यशोमती ठाकूर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून वेगळा ठसा उठविला आहे. यशोमती ताई ह्या राज्यासाठी,येथील सामान्य जनतेसाठी लढतात. त्यांनी शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी लढा दिला आहे. ही मुलुख मैदानी तोफ असून ती केवळ एक साधारण आमदार म्हणून परिचित नाही. यशोमती हे भावी नेतृत्व आहे. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक मतांनी यशोमती ताई यांना निवडून आणा,त्यांच्या विजयी रॅलीत मी सहभागी होईल. असे आवाहन देखील कन्हैया कुमार यांनी केले.
देशाच्या जडणघडणमध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे नेहमीच महाराष्ट्राने देशाची साथ दिली आहे, देशाला जोडणारी विचारधारा महाराष्ट्रातील नागरिकांनी स्वीकारली आहे. तेव्हा विकणारे व विकले जाणारे आमदार,गद्दार यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी सारख्या देशाला दिशा देणाऱ्या विचारधारेतील सरकारला आपण सत्तेत आणावे. जनतेतून निवडले जाणारे सरकार बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे. त्यामुळे लोकशाहीचा अवलंब करून आपण सरकार निवडावे. जातीत तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना आता जनता स्वीकारणार नसल्याचेही कन्हैया कुमार यांनी सांगितले.
यावेळी रिपाई नेते राजेंद्र गवई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रदीप राऊत यांनी देखील विरोधकावर तोफ डागली. जाहीर सभेला कम्युनिस्ट पक्षाचे नेते संजय मंगळे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिवसा मतदार संघात यशोमती ठाकूर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने त्यांच्या प्रत्येक पदयात्रा जाहीर सभेला नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यशोमती ठाकूर यांच्यावरील जनतेचे प्रेम पाहून विरोधकांची डाळ शिजणार नाही असे चित्र आता स्पष्ट झाले.
घर फोडून व पक्ष फोडून सत्ता स्थापन करणाऱ्यांना जनता आपल्या मतांची ताकद दाखवून देईल. ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या पाठीत देखील त्यांचा मुलगाच खंजिर खूपसेल. शेतकऱ्यांचे हाल करणारे, महिलांवर अत्याचार करणारे, सरकार आता घरी बसणार आहे. सातबारा कोरा करू असे म्हणणारे सत्तेत असताना काहीच करू शकले नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे हा अट्टाहास घेऊन आम्ही निवडणूक लढतो आहे. महाविकास आघाडी सर्वसामान्य जनतेला न्याय देईल असा विश्वास व्यक्त करून यशोमती ठाकूर यांनी येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करून आपल्याला निवडून द्यावे असे आवाहन केले.
ताई यशोमती आणि मी कन्हैया..
आजच्या जाहीर सभेत यायला थोडा उशीर झाला,मात्र मी जनतेची माफी मागतो अमरावतीशी माझे भावनिक नाते आहे. मी अमरावतीला नेहमीच येतो.ताई देखील मला अमरावतीला बोलवतात. कारण ताई यशोमती आहे आणि मी कन्हैया, असे सांगून कन्हैया कुमार यांनी यशोमती ताई व त्यांच्यातील असलेले दृढ नाते स्पष्ट केले. कन्हैया कुमार यांनी ताई बद्दल व्यक्त केलेल्या नात्याबद्दल उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात साद दिली.