मतदान केंद्रावर सर्व सुविधा पुरवाव्यात -जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती, दि. 16 : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकी पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता यंत्रणांनी फक्त मतदानावर लक्ष केंद्रित करावे. मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना सुखद अनुभव देण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी सर्व कट्यार यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, निवडणुकीसाठी ठरविण्यात आलेल्या मतदान केंद्राची पाहणी करण्यात यावी. याठिकाणी परिसर स्वच्छ ठेवणे, शेड, पाणी, स्वच्छतागृह यासह विजेची पुरेशी व्यवस्था असल्याबाबत खात्री बाळगण्यात यावी. या बाबींसाठी तातडीने सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्यात यावी. मतदान केंद्रावर सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात. यामुळे नागरिकांना मतदान करताना करणे सुकर होईल.
मतदानादरम्यान दि. 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान विविध अहवाल द्यावयाचे असतात. याची पूर्वतयारी आधीच करून ठेवण्यात यावी. अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी. अहवाल सादर करताना ते वेळेत सादर होतील याची काळजी घ्यावी.
नागरिकांना मतदानाची माहिती प्राप्त व्हावी, यासाठी वोटर स्लिप वाटप करण्यात येत आहे. अद्यापही काही भागात या वोटर स्लिप कमी प्रमाणात वाटप झालेल्या आहे. याठिकाणी दोन दिवसात सर्व वोटर स्लिप वाटप होईल, याची काळजी घ्यावी.
मतमोजणीमध्ये पोस्टल बॅलेटने झालेले मतदान काळजीपूर्वक मोजावे. याकामी स्वतंत्रपणे मनुष्यबळ नेमण्यात यावे. विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये कमी अंतर असल्याने सर्वांचे लक्ष पोस्टल बॅलेट वर राहणार आहे. त्यामुळे सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये एकसारखी प्रक्रिया राबविण्यात यावी. मतदानाची टक्केवारी नोंदविताना ती योग्यरीत्या भरण्यात यावी. प्रामुख्याने अंतिम टक्केवारी सादर करताना काळजी घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिले.