विशेष सामान्य निरीक्षकांकडून निवडणुकीचा आढावा
अमरावती, दि. 16 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निवडणूक विषयक तयारीची माहिती दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह विधानसभा निवडणुकीचे सर्व निरीक्षक उपस्थित होते.
राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विशेष सामान्य निरीक्षक म्हणून राम मोहन मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणूकविषयक तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीच्या अनुषंगाने झालेले मतदान यंत्राचे सरमिसळीकरण, मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, गृह मतदान आणि कर्मचाऱ्यांच्या मतदानाबाबत माहिती घेतली. मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मतदान प्रक्रिया आणि मतदान यंत्र ठेवण्यात येणाऱ्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्यात. या ठिकाणी आवश्यकतेनुसार सीआरपीएफ, सीएपीएफ यांची नियुक्ती करण्यात यावी. क्रिटिकल मतदान केंद्रावर अतिरिक्त लक्ष ठेवण्यात यावे. तसेच सी-व्हिजील आणि इतर ठिकाणाहून येणाऱ्या तक्रारींचा वेळीच निपटारा करण्यात यावा. निवडणुकीसाठी स्थिर पथक, फिरते पथक यांच्याकडून योग्य कार्यवाही व्हावी. निवडणुकीदरम्यान कोणतीही अफवा पसरविली जाणार नाही, यासाठी सोशल मीडियावरही विशेष लक्ष द्यावे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची निर्देशही श्री. मिश्रा यांनी दिले.
बैठकीपूर्वी श्री. मिश्रा यांनी विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्याशी चर्चा केली.