अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डीन ॲड्रेस *जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची उपस्थित
अमरावती, दि. 19 : नव्याने सुरु झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. महाविद्यालयातील प्रवेशीत 99 विद्यार्थ्यांसाठी सोमवार, दि. 18 नोव्हेंबर रोजी डीन ॲड्रेस कार्याक्रम घेण्यात आला.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. अविनाश सावजी, डॉ.आशिष सातव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. विद्यार्थ्यांनी निश्चित केलेले ध्येय अथक मेहनत व परिश्रमामुळे मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. सदर ध्येयप्राप्ती ही फक्त सुरुवात असून भविष्यात आपले ध्येय निश्चित करुन प्रगती करावी, विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक सत्र प्राथमिकतेने पूर्ण करावे. इतर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे, तसेच इतर विषयाचे पुस्तके व ग्रंथ याचे वाचन करुन सर्व विषयातील माहिती घेण्याबाबत विद्यार्थ्यांना सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी सर्व विभागांनी, डॉ. अनिल बत्रा, डॉ. किशोर इंगोले व कर्मचारी यांचे कौतुक केले. डॉ.अविनाश सावजी व डॉ.आशिष सातव यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवेबद्दल माहिती दिली. वैद्यकीय व्यवसायातून सामाजिक कार्य करावे असे आवाहन केले. डॉ. किशोर इंगोले यांनी विद्यार्थ्यांच्या भेटी घेत मागदर्शन केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ.नितीन अंभोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाकरीता नियुक्त कंत्राटदार श्री. देशमुख यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलिप सौंदळे, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अमोल नरोटे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनोद पवार, प्रशासकीय अधिकारी संजय मैदानकर, शिवम घारड, जयश्री घाडगे, पियूष सरोदे उपस्थित होते.