LIVE STREAM

AmravatiEducation NewsLatest NewsLocal News

धम्मक्रांतीमुळे समाजामध्ये आमुलाग्र बदल – डॉ. मोहन वानखडे

विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती व त्याची प्रासंगिकता विषयावर व्याख्यान संपन्न

               1935 मध्ये नाशिकमधील येवला येथे धम्मपरिवर्तनाची घोषणा केल्यानंतर तब्बल एकवीस वर्षानंतर 1956 साली धम्मपरिवर्तन झाले. या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्माचा सखोल अभ्यासही केला आणि कोणतीही हिंसा न करता धम्मपरिवर्तन केले. या धम्मक्रांतीमुळे समाजामध्ये आमुलाग्र बदल घडून आले, असे प्रतिपादन नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील पाली विभागाचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. मोहन वानखडे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित  ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती व त्याची प्रासंगिकता ’ या विषयावर   व्याख्यान देतांना ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते.
                डॉ. वानखडे पुढे म्हणाले, धर्म आणि धम्म यात मोठा फरक आहे. धर्म म्हणजे वैयक्तिक, तर धम्म म्हणजे सामाजिक आचरण, शील, प्रज्ञा, करुणाचे आचरण म्हणजे धम्म होय. डॉ. बाबासाहेबांचा धम्मक्रांतीचा लढा हा धर्माविरुध्द नाही, तर तत्वाविरुध्द होता. लहानपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बुध्दाचे आकर्षण होते. धम्मक्रांतीमध्ये डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे मोठे स्थान आहे. आपल्या जीवनातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शील, सदाचारी आणि प्रज्ञाशील होते, असेही ते म्हणाले.
                 प्रमुख अतिथी डॉ. वैशाली धनविजय म्हणाल्या, अभ्यासपूर्वक आणि कसलीही हिंसा न होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केली. सर्व धर्माचा अभ्यास केला. इतरांना बदलण्यापेक्षा स्वत: बदलण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. धम्मदीक्षेचा  घेतलेला निर्णय हा लगेच घेतला गेला नाही. तर तर्कशुध्दपणे आणि विज्ञाननिष्ठ असा बुध्दाचा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला. आज जी समाजाची प्रगती झाली, ती विज्ञानामुळे, असेही त्या म्हणाल्या.
संविधान ही डॉ. बाबासाहेबांनी भारताला दिलेली अनमोल देण – डॉ. अविनाश असनारे
                  डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी भारताला दिलेले संविधान ही अनमोल देण आहे, एवढेच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाला लाभलेलं महान व्यक्तिमत्व आहे. भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना आपल्या विद्यापीठातही संविधानशील्प विद्यापीठाच्या ह्मदयस्थानी सर्वांना पहावयास मिळणार असल्याचे गौरवोद्गार अध्यक्षीय भाषणातून कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी काढले.
                   संत गाडगे बाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, मेणबत्ती प्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. संचालन प्रा. मनीषा लकडे यांनी तर आभार डॉ. तुळशीदास रामटेके यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. भी.र. वाघमारे, विद्यमान परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!