पशूपालकांनी पशूगणनेस सहकार्य करावे -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

राज्यात 21व्या पशूगणनेस सुरवात माहिती पुस्तिकेचे विमोचन
अमरावती : आजपासून राज्यातील पशूगणनेला सुरवात झाली आहे. सांख्यिकी माहितीसाठी ही पशूगणना अचूक होणे आवश्यक आहे. त्यामुळे पशूगणनेसाठी पशूपालक, गौशाळाचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय कावरे, महानगरपालिका उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, परिवहन विभागाचे सिद्धार्थ ठोके यांच्यासह अशासकीय सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, पशूची सांख्यिकी माहिती व्हावी, यासाठी दर पाच वर्षांनी पशूगणना होते. यासाठी प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी पशूपालकांनी सहकार्य करावे, तसेच जिल्ह्यात जनावरांचे 100 टक्के रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. तसेच अशासकीय सदस्यांना कामकाजासाठी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बँक खातेही उघडण्यात आले आहे. त्यामुळे समितीचे कामकाज करणे सुलभ होणार आहे.
पोलिस विभागातर्फे गेल्या कालावधीत पकडलेल्या जनावरांची माहिती सादर करण्यात आली. यात 586 जनावरे जप्त करण्यात आली असून 65 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेली जनावरे नोंदणीकृत असलेल्या गौशाळेत देण्यात यावी. यामुळे त्यांचे पोषण योग्यप्रकारे होण्यास मदत मिळेल. नोंदणी केलेल्या गौशाळांना 20 लाख रूपये अनुदान आणि प्रती जनावरामागे प्रतिदिन 50 रूपये अनुदान मिळणार आहे. पोलिसांनी गौवंश वाहतूक केलेली वाहने जप्त करून परिवहन विभागाच्या मदतीने वाहनाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करावी. तसेच वन विभानानेही त्यांच्याकडील पकडलेली जनावरे नोंदणीकृत गौशाळेला देण्याची कार्यवाही करावी, असे सांगितले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.