भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठात संविधान शिल्पाचे लोकार्पण

अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान शिल्प, संविधान उद्देशिका व संत गाडगे बाबांच्या दशसूत्री संदेशाचे लोकार्पण कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे शुभहस्ते आज करण्यात आले.
कुलगुरू डॉ. बारहाते यांनी संविधान शिल्पाचे लोकार्पण झाल्याची घोषणा केली. मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करीत आहोत. महाराष्ट्रामध्ये केवळ अमरावती विद्यापीठामध्ये संविधान शिल्प उभारल्या गेले, याचा आम्हां सर्वांना अभिमान वाटतो. अधिसभा सदस्य डॉ. संतोष बनसोड यांनी मांडलेला प्रस्ताव अधिसभा व व्यवस्थापन परिषदेने मान्य केला आणि त्याची कार्यपूर्ती अभियांत्रिकी विभागातील कार्यकारी अभियंता श्री शशीकांत रोडे व त्यांच्या चमूने अथक परिश्रम घेवून पूर्ण केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची मूल्ये संविधानातून दिली असून कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांनी मानवतेची मूल्ये दशसूत्रीतून दिलेली आहे. संविधान शिल्पाच्या माध्यमातून या दोनही महापुरुषांनी दिलेल्या मूल्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न येथील नागरिक, समाज व विद्यार्थी यांना दिशादर्शक व प्रेरणादायी असणार आहे. संविधानाची उद्देशिका व संत गाडगे बाबांचा दशसूत्री संदेश यातील स्पिरीट सारखेच आहे.
‘‘एक दिवस संविधानाकरीता’’ हा उपक्रम विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये संविधान दिनानिमित्त आयोजित करण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले असून, त्यानिमित्त सर्व विद्याथ्र्यांमध्ये संविधानाविषयी जनजागृती होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संविधान शिल्पाच्या माध्यमातून सर्व विद्याथ्र्यांना उर्जा व प्रेरणा मिळेल, असे सांगून त्यांनी संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात.
प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, भारतात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय ही लोकशाहीची मूल्ये संविधानामुळे भारतीयांमध्ये रुजली आहे. लोकशाही अधिक बळकट करण्याचे कार्य संविधानाच्या माध्यमातून होत आहे. सर्वांनी यापासून प्रेरणा घ्यावी, असेही ते म्हणाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, आय.आय.एल. संचालक डॉ. अजय लाड, कार्यकारी अभियंता श्री शशीकांत रोडे, अधिसभा सदस्य डॉ. संतोष बनसोड, डॉ. रविंद्र मुन्द्रे, डॉ. प्रशांत विघे आदी उपस्थित होते.
संविधान शिल्पाचे लोकार्पण झाल्यानंतर राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला हारार्पण, पुष्पार्पण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. पुस्तक देवून याप्रसंगी स्वागत झाले. प्रास्ताविकतेतून कुलसचिव डॉ. असनारे यांनी संविधान शिल्प लोकार्पण सोहळा आयोजनामागील भूमिका मांडली, तर अधिसभा सदस्य डॉ. बनसोड यांनी अधिसभेत मांडलेल्या प्रस्तावाविषयी माहिती दिली. श्री सर्जेराव गलपट यांनी संविधानावर कविता सादर केली. संचालन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. रत्नशील खोब्राागडे यांनी, तर आभार जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व संवैधानिक अधिकारी, विविध प्राधिकारिणींचे सन्माननीय सदस्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.