काश पटेल कोण आहेत, ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील FBI चे नवीन प्रमुख बनवलंय ?

अमेरिकेचे, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या कश्यप उर्फ काश पटेल यांची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच एफबीआय(FBI)च्या संचालकपदी नियुक्तीची घोषणा केली आहे.
भारतीय वेळेनुसार 1 डिसेंबर रोजी पहाटे 5 च्या सुमारास ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत ट्रुथ सोशल अकाउंटवर ही माहिती दिली आहे.
ट्रम्प यांनी लिहिले की, “मला हे घोषित करताना आनंद होतोय की कश्यप ‘काश’ पटेल हे एफबीआयचे पुढील संचालक असतील.”
ट्रम्प यांनी लिहिले की, “काश हे एक उत्कृष्ट वकील आहेत, उत्तम अन्वेषक आहेत आणि ‘अमेरिका फर्स्ट’वर त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भ्रष्टाचार उघड करण्यासाठी, न्यायचं संरक्षण करण्यासाठी आणि अमेरिकन लोकांच्या सुरक्षेसाठी अनेक कामे केली आहेत.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांच्याबाबत लिहिले की, “काश यांनी माझ्या पहिल्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केलं.”
काश पटेल यांच्या आधी ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्यासह भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामी यांना त्यांच्या सरकारमध्ये जबाबदारी दिली होती.
अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृत नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे. काश पटेल यांची नियुक्ती हाही त्याचाच एक भाग आहे.
अमेरिकेत, नवनिर्वाचित राष्ट्रपती सुमारे 4 हजार राजकीय नियुक्त्या करतात, ज्यासाठी अनेक महिने लागतात.
ट्रम्प यांचा राष्ट्रपती पदाचा शपथविधी सोहळा 20 जानेवारी 2025 रोजी होणार आहे, त्यानंतर ते अधिकृतपणे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारू शकतील.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुझान समरल वाइल्स (सुझी वाइल्स) यांना त्यांचे चीफ ऑफ स्टाफ बनवले होते. ती त्यांनी केलेली पहिली अधिकृत नियुक्ती होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात सुझान यांनी सहप्रमुख म्हणून काम केलं होतं.
याशिवाय त्यांनी अमेरिकेच्या सीमांच्या जबाबदारीसाठी टॉम होमन, संयुक्त राष्ट्रातील राजदूत म्हणून एलिस स्टेफॅनिक आणि पर्यावरण संरक्षण संस्थेच्या प्रमुखपदी ली झेलडीन यांची निवड केली.
गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकपदी तुलसी गबार्ड यांचाही समावेश केला होता. तुलसी गबार्ड स्वतःला हिंदू म्हणवतात पण त्या भारतीय वंशाच्या नाहीत.
कोण आहेत काश पटेल?
44 वर्षांचे काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वात विश्वासू व्यक्तींपैकी एक आहेत. ट्रम्प यांच्या विजयानंतर काश पटेल यांना अमेरिकेची गुप्तचर संस्था असणाऱ्या सीआयएचे प्रमुख बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती.
पण ट्रम्प यांनी जॉन रॅटक्लिफ यांना सीआयए प्रमुख बनवण्याची घोषणा केली आणि आता काश पटेल यांना एफबीआय संचालक बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, काश पटेल यांनी अमेरिकेचे कार्यवाहक संरक्षण सचिव क्रिस्टोफर मिलर यांचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केलं आहे.
याआधी पटेल हे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत राष्ट्रपतींचे उप सहाय्यक आणि दहशतवादविरोधी विभागाचे वरिष्ठ संचालक होते.
संरक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्या कार्यकाळात पटेल यांनी अनेक मोठ्या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
काश पटेल यांच्याच कार्यकाळात आयसिसचे प्रमुख अल बगदादी आणि अल कायदाचे कासिम अल रिमी मारले गेले आणि अमेरिकन ओलिसांना सुखरूप परत करण्यात आले
काश पटेल हे नॅशनल इंटेलिजेंसचे प्रभारी संचालकांचे प्रमुख उपनियुक्त होते. या भूमिकेत, त्यांनी 17 गुप्तचर संस्थांच्या ऑपरेशन्सवर देखरेख केली आणि राष्ट्रपतींना दररोज ब्रीफिंग दिलं.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सामील होण्यापूर्वी पटेल काश पटेल यांनी गुप्तचर विभागाच्या स्थायी निवड समितीचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केलं. 2016 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी कथित रशियन मोहिमेच्या तपासाचे नेतृत्व काश यांच्याकडेच होतं.
काश पटेल यांनी इंटेलिजन्स कम्युनिटी आणि यूएस स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेससाठीच्या अनेक संवेदनशील कार्यक्रमांची देखरेख केली आहे.
जगभरातील गुप्तचर आणि दहशतवादविरोधी प्रयत्नांसाठी अब्जावधी डॉलर्स निधी देणारा कायदा तयार करण्यातही त्यांनी मदत केली होती. गुप्तचर विभागाच्या स्थायी निवड समितीसाठी काम करण्यापूर्वी पटेल यांनी अमेरिकेच्या न्याय विभागामध्ये दहशतवाद अभियोक्ता म्हणूनही काम केलं आहे.
काश पटेल यांनी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, जिथे त्यांनी खून, ड्रग्जपासून ते अनेक गुंतागुंतीच्या आर्थिक गुन्ह्यांपर्यंतच्या प्रकरणांवर न्यायालयात युक्तिवाद केला आहे.
काश पटेल यांचं वैयक्तिक आयुष्य
एका भारतीय स्थलांतरित कुटुंबात काश पटेल यांचा जन्म झाला. त्यांच्या बाबत प्रकाशित झालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचा जन्म एका गुजराती कुटुंबात झाला असून त्यांचे वडील एका अमेरिकन एव्हिएशन कंपनीत काम करत होते.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार पटेल हे मूळचे न्यूयॉर्कचे आहेत. त्यांनी रिचमंड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. यानंतर ते न्यूयॉर्कला परतले आणि कायद्याची पदवी घेतली.
ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्रमाणपत्रही घेतले आहे. त्यांना आईस हॉकी खेळायला आवडते.
काश पटेल हे त्रिशूल नावाची कंपनी चालवतात. 2023 मध्ये या कंपनीने ट्रंप यांच्या ट्रुथ सोशल या वेबसाइटकडून सुमारे 1 कोटी रुपये घेतले होते.
त्रिशूल कंपनीने ट्रम्प यांच्या समर्थनार्थ उभारलेल्या सेव्ह अमेरिका युनिटचे सल्लागार म्हणूनही काम केलं आहे. आणि गेल्या दोन वर्षांमध्ये यासाठी 1 कोटींहून अधिक रक्कम घेतली आहे.
काश पटेल त्यांच्या ‘गव्हर्नमेंट गँगस्टर’ या पुस्तकात लिहितात की, ते अमेरिकेतील क्वीन्स आणि लाँग आयलंडमध्ये लहानाचे मोठे झाले.
त्यांनी लिहिलंय की त्यांचे पालक फार श्रीमंत नव्हते. त्याचे आई-वडील भारतातून स्थलांतरित झाले होते. आणि लहानपणी त्यांचं कुटुंब डिस्ने वर्ल्डला गेल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.