LIVE STREAM

Latest NewsMaharashtraMaharashtra Politics

चर्चेत नावं चार, संघाचा स्पष्ट नकार; आम्हाला अजिबात मान्य नाही; आरएसएस चा भाजपला स्पष्ट संदेश

विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं. निकालाला आठवडा उलटला तरीही अद्याप महायुतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. सत्ताधाऱ्यांना अद्याप मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवता आलेला नाही. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत यासाठी संघ आग्रही आहे. पण भाजपनं फडणवीस यांचं नाव अद्यापपर्यंत जाहीर केलेलं नाही.

महायुतीच्या नेत्रदीपक विजयात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. भाजपचं नेतृत्त्व त्यांनीच यशस्वीपणे केलं. त्यामुळे तेच मुख्यमंत्रिपदास पात्र आहेत, असं संघाला वाटतं. तर दुसरीकडे भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांच्यासोबत विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची नावं चर्चेत आहेत. यातील तावडे, पाटील, मोहोळ मराठा समाजातून येतात. तर बावनकुळे ओबीसी समाजातून येतात. महायुतीच्या विजयात दोन्ही समाजांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच या दोन्ही समाजातील नेत्यांच्या नावांचा विचार भाजप नेतृत्त्वाकडून मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात येत आहे.

भाजप महायुती विजयी झाल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा विचार करुनच संघ परिवारानं विधानसभा निवडणुकीत प्रचार केला. संघाचे हजारो स्वयंसेवक त्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये जाऊन प्रचार केला. संघ प्रचंड सक्रिय झाल्यामुळेच लोकसभेला ४८ पैकी १७ जागा जिंकणारी महायुती विधानसभेला २८८ पैकी २३४ जागांपर्यंत पोहोचली. लोकसभेला भाजपच्या जागा ३३ वरुन ९ वर आल्या होत्या. विधानसभेला त्या १०५ वरुन १३२ वर गेल्या. फडणवीस यांनीच भाजपचं नेतृत्त्व केल्यानं ते मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पात्र ठरतात, असा संघाचा दावा आहे. फडणवीसांची निवड न झाल्यास त्याचा फटका पक्षाला महापालिका निवडणुकांमध्ये, विशेषत: मुंबईत बसेल, असं संघाला वाटतं.

नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदं मिळण्याची दाट शक्यता आहे. त्या पदांवर बहुधा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचीच वर्णी लागेल. हे दोघे मराठा समाजाचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या सोबत भाजपनंही मराठा नेताच मुख्यमंत्रिपदी देण्याचं कारण नाही, असा संघाचा युक्तिवाद आहे. फडणवीसांच्या नेतृत्त्वात यश मिळालं. मग त्याचं श्रेय त्यांना देऊन मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव जाहीर करण्यास उशीर का होतोय, असा संघाचा सवाल आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!