India News
सुखबीर सिंह बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला, गोल्डन टेम्पल परिसरात गोळीबार

शिरोमणी अकाली दलचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. सुवर्ण मंदिरात धार्मिक शिक्षा भोगत असलेल्या सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र, यातून ते थोडक्यात बचावले गेले आहेत. दरबार साहिबसमोर हल्लेखोराने केलेल्या गोळीबारामुळे सुवर्ण मंदिर परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, तेथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला तात्काळ पकडलं. सुखबीर सिंग बादल यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला तेव्हा ते सुवर्ण मंदिराच्या बाहेर एक धार्मिक शिक्षेसाठी द्वारपाल म्हणून सेवा देत होते.
अकाली दलचे नेते सुखबीर सिंह बादल दरबार साहिबच्या गेटवर द्वारपाल म्हणून सेवा देत होते. धार्मिक शिक्षेचा एक भाग म्हणून ते द्वारपाल म्हणून सेवा देत होते. तेवढ्यात समोरून एक हल्लेखोर आला आणि त्याने त्याच्याकडील पिस्तूल काढली. त्यानंतर त्याने सुखबीर सिंग बादल यांच्यावर निशाणा साधला. तेवढ्यात सुखबीर सिंग बादल यांच्या शेजारी उभा असलेला एक व्यक्ती पुढे येतो आणि हल्लेखोराचे हात पकडतो. यावेळी त्यांच्यात छटापट होते. यादरम्यान बंदुकीतून एक गोळी चालते. मात्र, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच, इतर लोकही या हल्लेखोराला पकडायला येतात. या सर्वांनी मिळून आरोपीला पकडलं. हा हल्लेखोर सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबार करण्याच्या उद्देशाने आल्याचं समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या हल्ल्यात त्यांना काहीही झाले नसले तरी परिसरात दहशत पसरली आहे. हल्लेखोर खलिस्तानी कारवायांमध्ये सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. नारायण सिंह चौडा असे आरोपीचे नाव आहे. आरोपीवर यापूर्वीही अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.