महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी भीमसागर उसळला

६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. २५ लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे. यावेळी मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन केले.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असे म्हणणारे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६८ वी पुण्यतिथी साजरी केली जात आहे. समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हाच दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. बाबासाहेबांचा 68 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. काल पासून अनुयायी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्वपूर्ण सुधारणा घडल्या असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सांगितले. दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल श्री. राधाकृष्णन संबोधीत करीत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी खासदार सर्वश्री नरेंद्र जाधव, राहुल शेवाळे, अमर साबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, बाबासाहेब जातीयवादापासून मुक्त राष्ट्र पाहू इच्छित होते, जिथे प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि विकासाची समान संधी मिळेल. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातील विविध राज्यांतूनही अनुयायी येतात. त्यांचे अतूट प्रेम, आदर आणि शिस्तबद्ध आचरण खरोखरच प्रेरणादायी आहे. ( भाषण – राज्यपाल सी. पी राधाकृष्णन)
सध्या भारत जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आपला देश सध्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. या प्रगतीचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे, देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या येवू दे, त्या सोडवण्याचा उपाय भारतीय संविधानामध्ये आहे. असे जगात सर्वात सुदर असलेले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे. असे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. ( भाषण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे, सत्ता हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. त्याचा उपयोग आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याणासाठी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही, तर जगभरातील मानवी हक्कांच्या प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. ( भाषण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून शासनाचा कारभार असणार आहे. राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी शासनाने कायम घेतली आहे. भविष्यातही वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा विचार शासन करणार असून त्यामुळे त्यांच्या जीवनात निश्चितच आनंद निर्माण होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. ( भाषण – उपमुख्यमंत्री अजित पवार)
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.