महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य विनम्र अभिवादन

अमरावती ०६ डिसेंबर :- शतकानुशतके पिढ्यान पिढ्या सामाजिक गुलामीच्या अंधकारात खितपत पडलेल्या अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी संपूर्ण आयुष्यभर प्रस्तापितांविरुद्ध लढा उभारून सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे महामानव हे थोर समाजक्रांतिकारक होते. त्यांनी हीन-दिन दलित, स्पृश्य-अस्पृश्य समाजाला न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी जीवाचे रान केले. त्यांच्या सामाजिक लढ्यातून आज समाजातील वंचित,शोषित,पिडीत,उपेक्षित घटकाला नवे सामाजिक जीवन मिळाले आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशात समता, बंधुत्व, न्याय ही लोकशाहीची मूल्ये प्रस्थापित झाली. ज्ञानाचा अथांग महासागर व जागतिक विद्वानांचे शिरोमणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजसुधारक, तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित, होते. त्यांचे सामाजिक, राजकीय,आर्थिक व समतावादी विचार हे देशाला विकास व प्रगतीच्या अतिउंच शिखरावर नेणारे आहे. आज ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य देशवासीयांनी त्यांचे स्मरणकरून पावन स्मृतीस श्रद्धासुमन अर्पण केले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाणदिना दिना निमित्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर-जिल्हाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. इर्विन चौक स्थित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच महामानवाचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष प्रशांत डवरे, माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, माजी नगर सेवक भुषण बनसोड, रतन डेंडूले पहेलवान,मंगेश मनोहरे, तसेच भास्कर ढेवले, अमित तायडे, राहुल इंगळे, निखिल भुयार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संकेत बोके, अभिजित लोयटे, सुयोग ढोरे, उज्वल पांडे, निलेश जामनिक,आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी इर्विन चौकात अनुयायांची गर्दी दिसून आली. भीमराया. घे तुझ्या या लेकरांची वंदना.. जब तक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा.. अशा शब्दातून ज्ञानाच्या अथांग महासागरास मानवंदना अर्पण करण्यात आली