दिल्लीच्या ४४ शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्याची ईमेल द्वारे धमकी… अनेक शाळा बंद..

राजधानी दिल्लीतील अनेक मोठ्या शाळांसह 44 शाळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. ज्यामध्ये डीपीएस आरके पुरम आणि पश्चिम विहारच्या जीडी गोएका स्कूललाही बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला आहे. त्यानंतर शाळांनी मुलांना घरी पाठवले आहे. अनेक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. बॉम्बच्या धमकीनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सोमवारी दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. ज्यामध्ये डीपीएस आरके पुरम आणि पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूल, स्कल, मदर मेरी स्कूल, ब्रिटिश स्कूल, सलवान पब्लिक स्कूल, केंब्रिज स्कूलसह अनेक शाळांचा समावेश आहे.
ईमेल करणाऱ्याने पैसे मागितले –
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आज 40 हून अधिक शाळांना ई मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. मेलमध्ये लिहिले आहे की, मी इमारतीच्या आत अनेक बॉम्ब पेरले आहेत. बॉम्ब लहान आणि अतिशय चांगले लपवलेले आहेत. त्यामुळे इमारतीचे फारसे नुकसान होणार नाही, मात्र बॉम्बचा स्फोट होऊन अनेक जण जखमी होणार आहेत. जर मला $30,000 मिळाले नाहीत तर मी बॉम्बचा स्फोट करीन.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, आज दिल्लीतील 40 शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. हे जाणून आम्हाला धक्का बसला आहे. कारण आमची मुले सुरक्षित नाहीत. भाजपने दिल्लीत भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे. पुढे म्हणाले की, जर देशाची राजधानी सुरक्षित नसेल तर केंद्र सरकार काय करत आहे? दिल्लीत असे भीतीचे वातावरण मी पाहिलेले नाही.
यापूर्वीही शाळांना धमक्या आल्या आहेत –
29 नोव्हेंबर रोजी रोहिणीतील व्यंकटेश्वरा ग्लोबल स्कलला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. याच्या एक दिवस आधी प्रशांत विहार परिसरात कमी तीव्रतेचा स्फोट झाला होता. ज्यात एक जण जखमी झाला. राजधानीत सातत्याने अशाच धमक्या येत आहेत.
दिल्लीतील प्रशांत विहारमध्ये स्फोट झाला –
गुरुवारी सकाळी प्रशांत विहार परिसरातील एका उद्यानाजवळ मिठाईच्या दुकानासमोर भीषण स्फोट झाला. या स्फोटात घटनास्थळी उपस्थित असलेला एक टेम्पो चालक जखमी झाला. महिनाभरापूर्वी याच परिसरात असलेल्या सीआरपीएफ शाळेच्या भिंतीजवळ भीषण स्फोट झाला होता. या प्रकरणी अद्याप पोलिसांना आरोपीबाबत कोणताही सुगावा लागलेला नाही. स्फोटाप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत विहार पोलिस स्टेशनने अज्ञात व्यक्तीविरुद्ध स्फोटक पदार्थ कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार धोकादायक शस्त्रे किंवा उपकरणांनी गंभीर दुखापत केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. बी ब्लॉकमध्ये गुरुवारी झालेल्या स्फोटात टेम्पो चालक जखमी झाला.
तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळावरुन टायमर, डिटोनेटर, बॅटरी, घड्याळ, वायर आदी साहित्य सापडले नाही. प्राथमिक तपासानंतर, यात नायट्रेट आणि हायड्रोजन पेरॉक्साइड रसायनांचा वापर करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे, जे उच्च दर्जाचे स्फोटक मानले जात नाहीत. चालकाने कचऱ्यात ठेवलेल्या स्फोटकावर बिडी फेकल्याने हा स्फोट झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पोलिस तपासणी करत आहेत.