नायलॉन मांजा विक्रीवर मनपाच्या भरारी पथकांची नाराजी

राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करीत असतांना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही शहरातील पतंगबाजी करणारे काहीजण नायलॉन मांजाच्या शोधात असतात. त्यामुळे पतंग ‘उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयात करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) यांनी दिले आहेत. मनपा भरारी पथकांद्वारे नियमित पलंग, मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत असून दर दिवसाच्या कारवाईचा अहवाल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांद्वारे मागविण्यात येत आहे. दरवर्षी तीळसंक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडविण्याची परंपरा आहे. त्यासाठी महिनाभरा आधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरु होते.
नायलॉन धागा वापरण्यास बंदी असतांना शहरात हा धागा वापरला जात असल्याचे आढळून येते. याच्या वापराने पशु-पक्षी तसेच नागरिकांनासुद्धा गंभीर इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महानगरपालिकेचे उपद्रव शोधपथक यावर कारवाई करत असून नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर १० हजारांचा दंड आणि साठा आढळल्यास १ लाखाच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहे.