हा धर्म समन्वय कर्ता विरळा संत…! – ह.भ.प. नयना बच्चू कडू गीता जयंती महोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी
वयाच्या नवव्या महिन्यातच अंधत्व आल्यानंतर सुद्धा संपूर्ण जगाचा अभ्यास असणारे गुलाबराव महाराज हे असामान्य आणि अलौकिक संत होते.विसाव्या शतकातील संत श्रीगुलाबराव महाराज केवळ ३४ वर्षे आपले आयुष्य जगले आणि त्यांनी आपल्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत १३४ ग्रंथ लिहिले जे आजच्या जीवनशैलित अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या पिढीसाठी उत्तम डोळस उदाहरण देखील आहे.परमेश्वराच्या या अवताराने आपल्या जिल्ह्यात जन्म घ्यावा यापेक्षा आपले मोठे भाग्य नाही असे अमूल्य विचार ह.भ.प नयना बच्चू कडू यांनी व्यक्त केले.संत श्री गुलाबराब महाराज सेवा संस्थांन बोराळा यांच्या वतीने आयोजित गीता जयंती महोत्सवात गुलाब गौरव कथेच्या माध्यमातून त्या महाराजांच्या कथे बद्दल आपला विचार व्यक्त करत होत्या.
५ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान भक्तीधाम चांदुर बाजार येथे गीता जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला असून दुपारी २ ते ५ दरम्यान ह.भ.प. नयना कडू या गुलाब गौरव कथेच्या माध्यमातून संत गुलाबराव महाराज यांचे आध्यत्मिक व विज्ञानवादी विचार मांडत आहेत.हभप नयना कडू यांनी संत गुलाबराब महाराज यांच्यावर पीएचडी केलेली असून गुलाबराव महाराज यांचे जन्म ठिकाणापासून तर ज्या ज्या ठिकाणी महाराजांचे वास्तव्य राहले आहे अश्या अनेक राज्यातील त्या त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष संदर्भ त्यांनी घेतलेले आहेत.
पुढे त्या म्हणाल्या की, आपण कल्पना करु शकणार नाही की एक आंधळी व्यक्ती एवढी पुस्तके लिहु शकतो,तेही वेगवेगळया विषयावर जसे ध्यान, योग, उपनिषद् , ब्रम्हसुत्र , थियोसोफी शास्त्र कठीणातले कठीण असे विषय त्यांना समजले. ज्यांचे खुप शिक्षण झाले आणी जे अत्यंत हुशार आहेत, त्यांना सुध्दा असे विषयावर लिखाण केले नसेल. त्यांना शास्त्राचा अभ्यास करण्यास वेळ कधी मिळायचा? संस्कृत भाषेचे ज्ञान त्यांनी कसे मिळविले? त्यांची लिहीण्याची वैदीक पध्दत त्यांनी कशी अवगत केली? हे सर्व प्रश्न आपल्या मन – बुध्दीला पडतात जेव्हा त्यांचे जीवन चरित्र आपण वाचतो.
गुलाबराव महाराज स्वत:ला ज्ञानेशकन्या आणी भगवान श्रीकृष्णाची पत्नी मानायचे. १९०१मध्ये श्री ज्ञानेश्र्वर महाराज यांचा प्रत्यक्ष अनुग्रह व 1905 मध्ये भगवान श्रीकृष्णाचा रासलीला अधिकार श्री महाराजांनी प्राप्त केला. १९०२ मध्ये ते २१ वर्षाचे होते तेव्हा त्यांनी डार्वीन आणी स्पेनसरच्या तत्वज्ञानावर खंडन मांडणं करणारे विचार प्रगट केले जे आजची आपणास विचार करायला भाग पाडतात. त्यांनी वेगवेगळया विषयावर पुस्तके लिहीली जसे ध्यान, योग आणि भक्ती. त्यांनी ‘ मानसायुर्वेद ’ नावाचे पुस्तक लिहीले ज्यात शास्त्रीयदृष्टया आयुर्वेदाची माहीती लिहीली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. श्री गुलाबराव महाराज यांच्या अनेक ग्रंथांचा समीक्षात्मक विवरण करता पूर्णतः त्या सर्व सूत्रांचा मार्मिक आणि उदाहरणासह विवेचन आदरणीय ताई करत आहेत. श्री गुलाबराव महाराजांचे चरित्र आणि त्यांच्या साहित्याचा पुरेपूर अभ्यास असून सुद्धा श्री महाराजांवरती ज्यांची पूर्ण निष्ठा आहे त्यांच्याजवळ श्री महाराजांच्या अनेक अनुभूती प्रचितीला येतात असे त्यांचे ठाम मत आहे.
संत गुलाबराव महाराज यांचा भक्त परिवार अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात व राज्याबाहेर देखील आहे. गीता जयंती महोत्सवाला दूरवरून भाविक भक्त आले असून गुलाब गौरव कथा ऐकण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे.ह.भ.प.नयना बच्चू कडू यांनी संत गुलाबराव महाराज यांचे अनेक संदर्भ आणि त्यांच्यामधील अध्यात्म सोप्या भाषेत भाविकांसमोर मांडले.भाविकांना माहीत नसणाऱ्या काही अध्यात्मिक बाबींचा देखील उलगडा यावेळी ह.भ.प.नयना कडू यांनी केला.यावेळी पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त गुलाब गौरव कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित होत आहे.