सरपंचांसोबत घडलं भयंकर; कारमधून खाली ओढून बेदम माराहण, नंतर गाडीत कोंबून नेत संपवलं

दीपक जाधव, बीड : बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचा मृतदेह आढळला आहे. दैठणा गावाच्या जवळ (ता. केज) त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी ९ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास संतोष देशमुख यांचं टोलनाका जवळून अपहरण झालं होतं.
नेमकं काय घडलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हे त्यांच्या चारचाकी वाहनातून (एमएच ४४ बी ३०३२) मामेभाऊ शिवराज लिंबराज देशमुख यांच्यासह मस्साजोगकडे जात होते. ते निघालेल्या मार्गावर डोणगाव टोलनाका जवळ त्यांची कार अडवण्यात आली. चारचाकी वाहनातून आलेल्या आलेल्या व्यक्तींनी संतोष यांची कार अडवली. अपहरणकर्त्यांच्या गाडीतून उतरलेल्या सहा जणांनी संतोष देशमुख यांच्या कारची आधी तोडफोड केली. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना त्यांच्या कारमधून ओढून बाहेर काढलं.
कारमधून बाहेर काढून मारहाण, नंतर अपहरण केलं
अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेलं. या अचानक घडलेल्या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. अपहरणकर्त्यांनी सरपंचांना केजकडे नेलं असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात शिवराज देशमुख यांनी दिली.
सरपंच संतोष पंडितराव यांच्या मामेभावाच्या तक्रारीवरून सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांची दोन पथकं तातडीने देशमुख यांच्या शोधासाठी रवाना केली. मात्र काही वेळानंतर दैठणा गावाच्या रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केज पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतरच अधिकृत माहिती समोर येऊ शकेल.
दरम्यान, संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मस्साजोग ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळवून दिले. त्यांच्या मृत्यूमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.