अमरावती महानगरपालिका द्वारा संचालीत स्पर्धा परिक्षा अभ्यासीका केंद्राचे यश५ विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड
अमरावती :- अमरावती महानगरपालिका तर्फे संचालीत स्पर्धा परिक्षा ग्रंथालय / अभ्यासिका केंद्र, संत गाडगे बाबा कॅंम्प, गोपाल नगर, साईनगर, अमरावती शहरातील विद्यार्थ्यांकरीता दिपस्तंभ ठरत असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे. मनपाच्या या स्तुत्य व नाविण्यपुर्ण स्पर्धा परिक्षा ग्रंथालय / अभ्यासिकामुळे अंकुश कंटाळे, मयुरी गादरे, मयुरी गणवीर यांची कनिष्ठ लिपिक, जिल्हा न्यायालय अमरावती, रेणुका भोजने यांची कनिष्ठ लिपिक जिल्हा न्यायालय ठाणे, राजपाल लोखंडे यांची नागपूर कारागृह पोलीस या पदावर नियुक्ती झालेली आहे. या विद्यार्थ्यांनी सरळसेवा भरती अंतर्गत घेण्यात आलेल्या पद भरतीत यश प्राप्त केले आहे.
महानगरपालिका मा.उपायुक्त (सामान्य) नरेंद्र वानखडे यांच्या अथक प्रयत्नातून व संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. महिला व बाल विकास अधिकारी तथा शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम यांनी पुढाकार घेवुन काही वर्षापूर्वी स्पर्धा परिक्षा क्षेत्रात करियर करु इच्छीना-या शहरातील गरीब, होतकरु विद्यार्थ्यांकरीता मनपाने स्पर्धा परिक्षा ग्रंथालय / अभ्यासीका केंद्रांची निर्मिती केली असून हा महाराष्ट्र राज्यातील नाविण्यपूर्ण उपक्रम ठरला आहे. तेव्हापासून शेकडो विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेवून शासकीय सेवेत विविध पदावर रुजु झालेले आहेत.
महानगरपालिकेने हे स्पर्धा परिक्षा केंद्र गेल्या काही वर्षापासूनच सुरु केले असून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करण्याकरीता आवश्यक पुस्तके विद्यार्थ्यांच्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असून इतर आवश्यक सोई सुविधा पुरविण्याकरीता मनपा विशेष प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोई पुरविण्याकरीता मनपा आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांचे विशेष लक्ष आहे.
उपलब्ध क्षमतेपेक्षा विद्यार्थ्यांची प्रवेशाकरीता मागणी असल्याने शेकडो विद्यार्थी प्रतिक्षेत आहे. यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले असुन या विद्यार्थ्यांचे यशामुळे या केंद्रावरील अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व अधिकाधिक यश मिळेल अशी शुभकामना व्यक्त केली. यावेळी श्रीधर हिवराळे, अमोल साकोरे, विशाल इंगोले, अनिकेत भांडे व विद्यार्थी उपस्थित होते.