LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

धक्कादायक ! नववीतील मुलीचे टोकाचे पाऊल, आई समोरच संपवले जीवन ; कारण काय ?

सातारा : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माण तालुक्यातून दहिवडी येथील एका नामांकित विद्यालयात नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आईसमोरच बंधाऱ्यात उडी मारुन आत्महत्या केली आहे. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून आईच्या अश्रूंचा बांध फुटला आहे.

माणच्या दहिवडी-फलटण रस्त्यावरील माणगंगा नदीच्या पुलाच्या बंधाऱ्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अल्पवयीन मुलीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्रिवेणी दादासाहेब कांबळे असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव असून ती दहिवडी मध्येच वास्तव्यास होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, दहिवडी येथील एका नामवंत शाळेत त्रिवेणी कांबळे ही नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मंगळवारी नेहमीप्रमाणेच ती शाळेत गेली. पण काही वेळाने ती वर्गात दप्तर ठेवून बाहेर गेली. ही बाब शाळेतील शिक्षकांनी या विद्यार्थिनीच्या आईला फोन करून सांगितली, माहिती मिळताच आईने शाळेत येऊन पाहिले असता त्यांना त्रिवेणी दिसलीच नाही, दप्तर मात्र शाळेतच मिळाले. शाळा सुटल्यानंतर दप्तर घेण्यासाठी आपली मुलगी निश्चित येणार म्हणून आई शाळेतच थांबली होती. चार वाजण्याच्या सुमारास ती मुलगी शाळेजवळ दिसून आली. त्यावेळी त्या मुलीने आई शाळेत आल्याचे पाहिले.

आईला पाहताच ती दप्तर घेऊन तेथून माणगंगा नदीच्या दिशेने धावत सुटली. मुलगी आपल्याला न भेटताच शाळेतून निघाली असल्याचे पाहून मुलीची आई तिच्या मागे धावत गेली. यावेळी मुलगी पुढं व आई मागे पळत होती. पळत पळत मुलगी दहिवडी-फलटणवरील माणगंगा नदीच्या पुलावर पोहोचली आणि तिने रस्त्यावरच दप्तर फेकून शेतातून थेट नदीत उडी मारली. डोळ्यासमोर आपल्या मुलीने नदीत उडी मारल्याने आई गांगारून गेली. तिने मदतीसाठी आरडाओरडा केली. त्यावेळी शेजारी काही तरुण त्या ठिकाणी पोहोचले. मुलीने आपल्या डोळ्यासमोरच नदीत उडी घेतल्याने आईचा जीव अर्धमेला झाला होता.

घटनास्थळी उपस्थित तरुणांनी दहिवडी पोलिसात फोन करून या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी उपस्थित तरुण व नागरिकांच्या मदतीने त्या मुलीचा बाहेर काढले व तातडीने दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!