मामी-भाचा मुंबईतून पळून कोकणात, नवरा-बायको सांगून एकत्र राहू लागले, पण ठेकेदाराच्या मुलाने..

रत्नागिरी :- मजूर म्हणून काम करणाऱ्या मामीची भाचाने हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःही विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे मोठी खळबळ उडाली आहे. मयत महिला आणि आरोपी तरुण हे दोघेही परराज्यातील आहेत.
मामीचा गळा दाबून खून करून भाच्याने स्वतः विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यात घडली आहे. राखी पलाश मोंडळ असं मृत महिलेचं नाव आहे, तर तिचा भाचा निताई संजय मंडल याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात इंदवटी येथे मामी आणि भाचा दोघेही काम करत होते. ते ज्या ठिकाणी काम करत होते, त्याच ठिकाणी ते झोपडी बांधून राहत होते. बळीराम कबीराज हे मुकादम असून, त्यांच्याकडे राखी मोंडल व निताई मंडल दोघे काम करीत होते. ते कामावर न आल्याने ठेकेदाराच्या मुलाने झोपडीत जाऊन पाहिले. यावेळी दिसलेले दृश्य हे भयानक होतं.
निताई तडफडत होता, तर शेजारी राखी मोंडल याचा मृतदेह दिसून आला. निताईने राखी मोंडल यांचा गळा दाबून खून केला होता. तर स्वतः विष प्राशन केले होते, हे सगळं भयंकर दृश्य दिसले. या सगळ्या प्रकाराची खबर तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पश्चिम बंगाल येथून सहा महिन्यांपूर्वी निताई आपल्या मामीला घेऊन पळून मुंबईत आला. मोलमजुरीचे काम ते करत होते. त्यानंतर अलिकडेच हे दोघ लांज्यात आले होते. नवरा-बायको असल्याचे खोटे सांगून हे दोघे राहत होते, मात्र या हत्या प्रकरणानंतर त्यांच्यातील मामी भाच्याचं नातं समोर आलं आहे.
या प्रकरणी निताईने मामीची हत्या का केली, पश्चिम बंगाल येथून त्यांचे नातेवाईक लांजा येथे आल्यानंतरच हत्येचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या सगळ्या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. हे कुटुंब मूळचे पश्चिम बंगाल येथील आहे. या प्रकरणी अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.