LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

दिल्लीत अदानींच्या घरी भाजपचा केंद्रीय नेता आणि शरद पवार गटाच्या नेत्याची गुप्त भेट……

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत हातमिळवणी करणार का, अशी शंका निर्माण झाली आहे. गुरुवारी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटातील आमदार आणि खासदारांमध्ये चलबिचल सुरु झाल्याची माहिती आहे. दिल्लीत 4 डिसेंबरला शरद पवार गटाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत आपण सत्तेत गेले पाहिजे, असा मतप्रवाह दिसून आला होता. मात्र, शरद पवार गटात यावरुन दोन गट पडल्याची माहिती आहे. शरद पवार गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व ठेऊन भाजपसोबत सत्तेत सामील व्हावे, असे एका गटाचे म्हणणे आहे. तर दुसरा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या मताचा आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार आणि खासदार हे आता सत्तेत सामील होण्याच्या बाजूने दिसत आहेत. तसे झाल्यास राज्यातील महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येईल. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शरद पवार गट आणि भाजपमधील ही सगळी बोलणी दिल्लीत सुरु आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, नुकतीच अदानी यांच्या घरी झालेल्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेत्याने शरद पवार यांच्या गटातील नेत्याकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी काळातील शरद पवार गटाची भूमिका याबाबत माहिती घेतल्याचे समजते. उभय नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाच खासदार अजितदादा गटात सामील होतील, अशी चर्चा सुरु होती. या चर्चेचे मूळ आणि पडद्यामागील घडामोडी आता एक-एक करुन समोर येताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल असे सर्वांनाच वाटत होते. मात्र लोकसभेनंतर महाविकास आघाडीची परिस्थिती बदलली नाही. महाविकास आघाडीला लोकसभेत मोठा विजय मिळाला.

त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक बळावला होता. मात्र विधानसभेच्या निकालानंतर आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये काही बदल होऊ शकतात. 2014 च्या विधानसभेचे निकाल येत असतानाच शरद पवार यांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शरद पवार यंदाही असा काही निर्णय घेऊ शकतात का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, शरद पवार यांनी जर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल. शरद पवार हे भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यास महाराष्ट्रातील राजकारणाची रचना पुन्हा एकदा बदलेल हे मात्र तेवढच खर.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

This will close in 21 seconds