27 वर्षांपूर्वी हरवलेला तुझा मुलगा मीच म्हणत घरात एन्ट्री घेतली अन् प्रॉपर्टीसह पैशांवर दावा केला, भोंदूबाबाचा पर्दाफाश

सातारा क्राईम :- एखाद्या चित्रपटाला साजेल असा प्रकार साताऱ्यात समोर आला आहे. 27 वर्षापूर्वी हरवलेला तुझा मुलगा मीच असे म्हणत एकाने घरात एन्ट्री केली आणि तब्बल दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीत घरात राहून घरातील प्रॉपर्टीसह पैशावर अधिकृत दावा करणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड करण्यात साताऱ्यातील दहिवडी पोलिसांना यश आले आहे.
घरातील सर्व प्रॉपर्टीवर नाव चढवून घेतले, विवाहित बहिणींनाही खरं वाटलं
अधिकची माहिती अशी की, शिंदी बुद्रूक गावातील एका महिलेचा 1997 साली एकुलता एक मुलगा हरवला. कुटुंबासह पोलिसांनी शोध घेतला. मात्र तो मिळाला नाही. दोन वर्षापूर्वी एक साधू घरातील वृध्द महिलेसमोर आला आणि त्याने आई मला ओळखलेस का? असे म्हणत घट्ट मिठी मारून मीच तुझा मुलगा असे सांगितले. त्या महिलेसह त्या महिलेच्या विवाहीत बहिणीनांही खरे वाटले. त्याने रेशन कार्ड, आधार कार्ड यासह घरातील सर्व प्रॉपर्टीवर नाव चढवून घेतले. महिलेचे निधन झाले.
महिलेचा मुलगा सोमनाथ कुचेकर म्हणून वावरणारा हा बुवा भामटा असल्याचे समोर
दरम्यान, महिलेचे निधन झाल्यानंतर सर्व विधीही यानेच पूर्ण केले. आणि तो निघून गेला. वर्षश्राध्दाच्या वेळी तो पुन्हा आला. त्यावेळी काहींनी शंका व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली. आणि त्या वृध्द महिलेचा मुलगा सोमनाथ कुचेकर म्हणून वावरणारा हा बुवा भामटा असल्याचे समोर आले. हा मूळचा जळगाव येथील जामनेर येथील असल्याचे समोर आले असून त्याचे खरे नाव एकनाथ रघुनाथ शिंदे असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी शिंदे ला बेड्या ठोकल्या आहेत.