राजकीय व्यवहारात निकोप संकेत आणि परंपरा निर्माण करून त्यांचे कसोशीने पालन करण्यासाठी वचनबद्ध-आमदार सौ.सुलभाताई खोडके
अमरावती दिनांक-१४ डिसेंबर :- समाजातील प्रत्येक घटकांचा ,घटकातील प्रत्येकाचा विचार झाला पाहिजे. विशेष करून आर्थिक,सामाजिक कमकुवत घटकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यावर आपला भर आहे.शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधताना व अभिनंदनाचा स्वीकार करीत त्यांनी असे प्रतिपादन केले.महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली की कुटुंबाचा व समाजाचाही विकास होतो.त्यादृष्टीने विविध व्यवसाय,उपक्रमाची जोड देणे आवश्यक. शेतीपूरक व्यवसायांबरोबरच इतर व्यवसायांचा विचार होणे गरजेचे आहे. महिलांना सक्षम करण्याचे कार्य बचत गटाच्या माध्यमातून होत असते.
आर्थिक सक्षमीकरणाची ओढ,शासनाच्या सक्षमीकरणाच्या विविध योजना यासोबतच विकसित अमरावतीच्या स्वप्नपूर्तीसाठी विकासातील स्त्रियांचा सहभाग वाढीसाठी त्या दिशेने पावले उचलणे गरजेचे आहे.यावेळी त्यांनी उपस्थित नारीशक्ती सोबत सुद्धा मुक्त संवादात आपली भूमिका व्यक्त केली.भारतीय लोकशाहीला लिखित राज्यघटनेचे अधिष्ठान तर आहेच,पण त्याचबरोबर प्रत्यक्ष राजकीय व्यवहारात निकोप संकेत आणि परंपरा निर्माण करून त्यांचे कसोशीने पालन करावे लागते. त्यातूनच लोकशाहीचा आत्मा जपता येतो.
विविध क्षेत्रातील मान्यवरांशी भेटीगाठीतून त्यांनी यावेळी आपल्या शब्दांना वाट मोकळी करून दिली.सर्जनशील विचार,समस्या निराकरण,निर्णयक्षमता,वेळेचं काटेकोर नियोजन,सकारात्मक दृष्टिकोन, तर्कबुद्धी आणि संयमाच्या आधारे सर्व घटकांमध्ये सातत्यपूर्ण वावर आदी बाबींमुळे आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांच्या गाडगे नगर स्थित निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी सर्व मान्यवरांची एकच गर्दी दिसून येत आहे.यावेळी आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांचे अभिनंदन करतांना शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ-भेटवस्तू-अभिनंदन पत्र-मिष्ट पदार्थांसह विविधतेतून एकता चा परिचय करून देत अनेक धर्म,पंथ,भाषा,संस्कृतीचे मान्यवरांची दररोजच्या दररोज एकच रीघ लागल्याचे दृश्य दिसून येत आहे.
पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपल्या पदाचा बहुमान वाढवीत आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी लोकसंग्रहातून मिळविलेले स्नेह-जिव्हाळा-जनसामान्यांच्या आशीर्वादाचे पाठबळ याचीच परिणीती म्हणून ३८-अमरावती विधानसभा निवडणुकीत त्यांनी संपादन केलेला विजय हा जनतेच्या विश्वासाची पावती दर्शविणारा आहे.या स्वागत-सत्कार-अभिनंदनाचा स्वीकार करीत यावेळी आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी विनम्रपणे आभार मानत प्रत्येक उपस्थितांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करीत ही लोकशक्ती माझ्या सोबत अखंडितपणे राहू द्या.अशी सर्वांना विनंती करीत याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
याप्रसंगी नेशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन( निमा संघटना),श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर,श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट, सदिच्छा कॉलोनी-विनायक नगर,अमरावती, सर्वभाषिक धोबी समाज,अरुणोदय इंग्लिश स्कुल,विदर्भ कला शिक्षक संघ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा परिषद,रास्त भाव दुकानदार संघटना, माजी सैनिक संघटना,आदींसह अन्य सामाजिक संघटना चे सदस्य व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक-महिला भगिनींसह-युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.