LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

छगन भुजबळ समर्थक आक्रमक, अजित पवारांच्या फोटोला जोडे मारून नोंदवला निषेध

जालना :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी ‘मी नाराज आहे’ असं म्हणत आपली नाराजी उघड बोलून दाखवली आहे. आता भुजबळ समर्थक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात भुजबळ समर्थकांनी निदर्शने केली. यावेळी अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवला.

छगन भुजबळांना राज्य मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यामुळे जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. शहरातील गांधी चमन चौकात ओबीसींनी एकत्र येऊन अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारून या घटनेचा निषेध नोंदवला.

यावेळी भुजबळ समर्थकांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ओबीसींचा आवाज छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर यांना डावलत आहात. तुम्ही ओबीसींचा आवाज दाबत आहात. ओबीसी समाज एवढा दुधखुळा आहे का? आगामी निवडणुकांमध्ये दाखवून देऊ. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊ, असा इशारा ओबीसी समाजने दिला आहे.

अहिल्यानगरमध्येही निषेध


अहिल्यानगर शहरात माळीवाडा परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर ओबीसी समाजाच्या वतीने महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. छगन भुजबळ यांचा महायुतीने वापर केला असल्याची टीका देखील यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ ?

‘होय मी नाराज आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय, फेकलं काय काय फरक पडतो? मला मंत्रिपदे किती आली किती गेली. छगन भुजबळ संपला नाही. माझे बॅनरवरही फोटो नाहीत, चांगली गोष्ट आहे. कधी कधी जागा नसते बॅनरवर. मी कालपासून अजित पवारांसोबत काहीही चर्चा केली नाही. मला त्याची गरजही वाटत नाही, असे म्हणत छगन भुजबळांनी थेट अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

जरांगेंना अंगावर घेतलेल्याचं बक्षीस

तसेच ओबीसी लढ्यामुळेच महायुतीला मोठे यश आले. मनोज जरागेंना अंगावर घेतल्याचे बक्षीस मला मिळालं. मी माझ्या कार्यकर्त्यांशी, समता परिषदेच्या नेत्यांशी चर्चा करेन, त्यानंतर पुढे काय ते ठरवेन, असं छगन भुजबळ म्हणालेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!