राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत “कुसुम” “कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहीम”
अमरावती :- अमरावती महानगरपालिका शहरी आरोग्य केंद्र क्र.६ भाजीबाजार व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती द्वारा संचालित श्री रामकृष्ण क्रीडा आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती च्या वतीने सोमवार दिनांक १६ डिसेंबर,२०२४ रोजी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत “कुसुम” “कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहीम” श्री रामकृष्ण क्रीडा आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ.पूनम मोहोकार सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप पाटबागे, डॉ.विनंती नवरे पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोगपथक अमरावती, डॉ.फिरोज खान शहरी क्षयरोग अधिकारी मनपा अमरावती, डॉ.सैफ खान वैद्यकीय अधिकारी शहरी आरोग्य केंद्र भाजीबाजार, प्राचार्य एस.यु. भारसाकळे श्री रामकृष्ण क्रीडा आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, श्रीमती उमा जाधव आरोग्य पर्यवेक्षीका, अतुल धुंडे कुष्ठरोग तंत्रज्ञ, गजानन पन्हाळे अवैद्यकीय पर्यवेक्षक, अविनाश इंगळे कुष्ठरोग तंत्रज्ञ, शशीकांत जयस्वाल आरोग्य सेवक, सर्व सिस्टर श्रीमती धोटे, श्रीमती मानकर, प्रिती वानखडे, अंकीता बनकर, लीना वानखडे, सिता जाधव, जयश्री भगत तसेच आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरुग्ण प्रसार हे ध्येय्य साध्य करण्यासाठी समाजातील जोखीमग्रस्त भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करण्यासाठी शहरात १६ ते २० डिसेंबर या कालावधीत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) अंतर्गत आरोग्य विभागाकडून कुष्ठरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जोखीमग्रस्त भागातील नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य सेवकांना तपासणी करू द्यावी व योग्य माहिती देऊन सहकार्य करावे व मोहिमेमध्ये कुष्ठरोगाचे निदान झालेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर उपचार घ्यावा, असे आवाहन डॉ.पूनम मोहोकार सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती यांनी केले आहे.
कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) मोहीम सन २०२४-२५ च्या नियोजनासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे यांच्या सूचनेनुसार १६ ते २० डिसेंबर या कालावधीत शहरात चिरेखाण कामगार, आंब्याच्या बागांमधील राखणदार व तिथे वास्तव्य करणारे शेतमजूर तसेच बाहेरून कामानिमित्त आलेल्या स्थलांतरीत व्यक्ती, औद्योगिक वसाहतीतील कामगार, बांधकाम मजूर, आश्रमशाळा व वस्तीगृहात राहणारे विद्यार्थी तसेच कारागृहातील कैदी यांसारख्या जोखीमग्रस्त भागातील सर्व नागरिकांची तपासणी झाली पाहिजे व आरोग्य विभागामार्फत या मोहिमेचे प्रभावीपणे पर्यवेक्षण व्हावे, अशा सूचना डॉ.पूनम मोहोकार सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती यांनी दिल्या.
समाजातील नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे आवश्यक आहे. यासाठी या मोहिमेत १६ डिसेंबरपासून शहरात चिरेखाण कामगार, आंब्याच्या बागांमधील राखणदार व तिथे वास्तव्य करणारे शेतमजूर तसेच बाहेरून कामानिमित्त आलेल्या स्थलांतरीत व्यक्ती, औद्योगिक वसाहतीतील कामगार, बांधकाम मजूर, आश्रमशाळा व वसतिगृहात राहणारे विद्यार्थी तसेच कारागृहातील कैदी अशा जोखीमग्रस्त लोकसंख्येचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येऊन प्रत्यक्ष शारीरीक तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप पाटबागे यांनी दिली.
नागरिकांनी फिक्कट लालसर बधीर चट्टा, तेलकट गुळगुळीत चमकदार त्वचा, कानाच्या जाड पाळ्या, दुखऱ्या मज्जातंतु, हाता-पायाला मुंग्या येणे व अशक्तपणा येणे आदी लक्षणे दिसल्यास या मोहिमेत तपासणीसाठी घरी येणाऱ्या स्वयंसेवकाकडून तपासणी करून घ्यावी. तसेच संशयित रुग्णांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप पाटबागे यांनी केले आहे.या मोहीमे अंतर्गत सर्व शासकीय व निमशासकीय, मनपा दवाखान्यात निदान व उपचार मोफत करण्यात येत आहे.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत “कुसुम” “कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहीम” श्री रामकृष्ण क्रीडा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शहरातील श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत “कुसुम” “कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहीम” अंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
शहरात “कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहीम” जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यालयातील प्राचार्य एस.यु. भारसाकळे, संचालक आश्रम शाळा विभागाचे राजेश महात्मे, शिक्षक शिशिर गढीकर, आनंद महाजन, श्रीरंग साधु, विजय नरवणे, शिक्षिका मंगला महात्मे, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.