जिंतूर तालुक्यातील ईटोली शेतशिवारात बिबट्याचा धुमाकूळ; बिबट्याच्या हल्ल्यात लहानमोठ्या बारा शेळ्यांचा फडशा

जिंतूर :- तालुक्यातील इटोली येथील राजाराम खूणे यांच्या शेतातील (गट नं. ३९०) आखाड्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बारा शेळ्यांचा फडशा पाडला. सदर घटना सोमवारी उत्तर रात्री म्हणजे मंगळवारी (ता.१७) भल्या पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास घडली. घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वनरक्षक सीमा राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
इटोलीचा भाग डोंगराळ असून या भागात दाट जंगल आहे शिवाय पूर्णा नदी व तीच्या उपनद्या या भागातून वहातात, बंधारेही आहेत त्यामुळे परिसरात बिबट्या, कोल्हे, रानडुक्कर इत्यादी वन्यजीवांचा अधिवास आहे. अनेक शेतकरी पाळीव प्राण्यांसह शिवारातील आखाड्यावर राहतात कांहीजण बैल, गायी वासरे, शेळ्या आखाड्यावर बांधून ठेवतात.
रात्री अपरात्री हे वन्यजीव भक्षाच्या शोधात जंगलात भटकंती करतात त्यातूनच राजाराम खुणे यांच्यासह जवळच असलेल्या सदाशिव मोगरे, शिवाजी शेळके यांच्या आखाड्यावरील शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला असावा. यात एकूण बारा शेळ्या दगावल्याचे काही गावकरी सांगतात. त्यामुळे शेळीपालनाचा व्यवसाय असलेल्या शेळ्या मालकांचे मोठे आर्थिक संकटात सापडले आहेत.
दरम्यान वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या वन्य प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा व आर्थिक मदत देण्याची मागणी राजाराम खुणे, विठ्ठल मोगरे, शिवाजी शेळके यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती समजताच वन रक्षक सीमा राठोड (आडे) यांनी मंगळवारी सकाळी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट भेट देऊन पंचनामा केला. व पशू वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करून घेतले.