LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

 गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, अजित पवारांची जोरदार टोलेबाजी

अजित पवार :- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधानपरिषदेमध्ये आज सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार टोला लगावला. “गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू”, असे अजित पवारांनी म्हणताच विधानपरिषदेत एकच हशा पिकल्याचे दिसून आले.

राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव आज श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषद सभागृहात मांडला. या प्रस्तावाला विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे तसेच अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणे झाली. यावेळी अजित म्हणाले की, या विधानसभेचे वैशिष्ट्य पाहिले तर अनेक तरुण आमदार निवडून आले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांनी आपल्याबद्दल सांगितले. मात्र, आपण अजूनही चाळीशीत आहात, असेच वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.

गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार….

तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत रोहित पवारांनी 1100 मतांनी विजय मिळवला. यानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये सभा घेतली नाही, असा हल्लाबोल केला होता. यावरूनदेखील अजित पवारांनी वक्तव्य केलं. त्यांनी म्हटलंय की, मधल्या काळात राम शिंदे सर तुम्ही म्हणालात अजित पवारांनी माझ्या इथे सभा घेतली नाही. माझ्यामुळे आपला पराभव झाला, असे आपण बोलले. मात्र जे झालं ते चांगल झालं आपण सभापती झालात. कदाचित आपण निवडून आला असता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असे वाटले असते तर गिरीश महाजनांचे मंत्रिपद गेले असते. गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, असे म्हणत अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!