“संसद म्हणजे कुस्तीचा आखाडा नाही, आमच्या खासदारानं राहुल गांधींवर…!” किरेन रिजिजू संतापले

संसद परिसरातील हाणामारीवरून आता राजकारण तापताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या दोन खासदारांना धक्काबुक्की केली, असा आरोप भाजपने केला आहे. मात्र, काँग्रेसने भाजपचा आरोप फेटाळून लावला आहे. यातच, संसद म्हणजे कुस्ती आणि स्मार्टनेस दाखवण्याचे व्यासपीठ नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
आमच्या खासदाराने हात उचलला असता तर ? –
रिजिजू म्हणाले, “राहुल गांधींनी शारीरिक ताकद दाखवली. त्यांनी आमच्या दोन खासदारांना धक्काबुक्की केली. आमच्या खासदारांनीही हात उचलला असता तर काय झाले असते ? तुम्ही राहुल गांधी इतर खासदारांना मारण्यासाठी कराटे-कुंगफू शिकलात का ?” राहुल गांधींनी भाजपचे दोन खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांना जोरदार धक्काबुक्की केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले.
भाजप खासदारांनी संयम दाखवला –
केंद्रीय मंत्री रिजिजू पुढे म्हणाले, “राहुल गांधींना कोणत्या कायद्याने दुसऱ्या खासदाराला धक्का-बुक्की करण्याचा अधिकार दिला ? जर प्रत्येकाने आपली ताकद दाखवून हाणामारी करायला सुरुवात केली, तर संसदेचे कामकाज कसे चालेल. ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. आम्ही संयम दाखवला आहे. भाजप-एनडीएचा कुठलाही खासदार धक्का-बुक्की करत नाही. ते आपली बाजू मांडतात.लोकशाहीत सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिका आहे.
“खासदार आपापल्या विचारांना घेऊन संसद परिसरात आंदोलन करत असतात. काँग्रेस आणि I.N.D.I.A. चे लोक रोज निदर्शने करत असतात. आज एनडीएच्या खासदारांनी निदर्शन केले. कारण, काँग्रेस स्वातंत्र्याच्या काळापासून ते आत्तापर्यंत बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा अवमान करत आली आहे आणि आता संसदेच्या आत आणि बाहेरही खोटे बोलून गृहमंत्री अमित शहा यांचा व्हिडिओ कापून पसरवला,” असेही केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे.