LIVE STREAM

Crime NewsLatest NewsState

सायबर फसवणुकीची मास्टरमाईंड, २१ वर्षांची युवती! कोट्यवधींचा गंडा आणि…

नवी दिल्ली :- असे म्हणतात की गुन्ह्याला पाय नसतो, तरीही तो निसटतो. पण कायद्याचेही हात लांब असतात आणि शेवटी तो पकडला जातो. एका महिला गुन्हेगाराला पोलिसांनी पकडले परंतु पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ती पळून गेली. ९ महिन्यांनंतर पोलिसांना पुन्हा तिचा सुगावा लागला आणि यावेळीही ती छतावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती, मात्र अखेर पोलिसांच्या बेड्यांनी तिला अडकवले.

बिहारच्या सिवान जिल्ह्यातील नुरुहाता गावात राहणाऱ्या एका मुलीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. कुटुंब गरीब असल्याने तिला दहावीपर्यंतच शिक्षण घेता आले. काही काळानंतर तिची सायबर गुन्हे करणाऱ्यांशी ओळख वाढू लागली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ती सुद्धा सायबर क्राईमच्या वाटेवर वळली आणि एके दिवशी तीने पुण्यात 4 कोटी रुपयांवर डल्ला मारला.

अवघ्या २१ वर्षांची सानिया मुस्तकीम सिद्दिकी कधी सोफिया तर कधी गुडीया नावाने गुन्हे करायची. दहावी पूर्ण केल्यानंतर घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले. पण, काही काळानंतर तिचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर गुडिया सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात आली आणि छोटे मोठे गुन्हे करू लागली.

हरियाणा आणि बिहारमध्ये तीच्या टोळीचा तळ होता. तिच्याकडे फसवणूक केलेले पैसे हस्तांतरित केलेल्या खात्यांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी देण्यात आली.

पुण्यातील एका बड्या रिअल इस्टेट कंपनीच्या वरिष्ठ अकाऊंट ऑफिसरला एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशी करून दिली. अधिकाऱ्याला काही खात्यांमध्ये ४ कोटी ६ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. काही काळानंतर जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा ही सायबर फसवणूक असल्याचे उघड झाले, ज्याची मास्टरमाईंड बिहारच्या सिवान जिल्ह्यातील २१ वर्षीय सानिया उर्फ गुडिया असल्याचे समोर आले.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सागर जयंतीलाल बोरा यांनी या प्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर तपास करण्यात आला आणि फोन नंबरसह बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पोलीस आरोपी गुडियापर्यंत पोहोचले. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी गुडियाला हरियाणातील फरिदाबाद येथून अटक करण्यात आली होती.

सायबर फसवणुकीची मास्टरमाईंड पकडल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आता उघडकीस येईल, असे सर्वांना वाटत होते. पण तरीही छुपा खेळ सुरूच होता. दुरांतो एक्स्प्रेसने पोलीस तिला पुण्यात आणत असताना गुडिया पोलिसांना हुलकावणी देऊन पळून गेली. ट्रेन पुढच्या स्थानकावर थांबल्यावर ती गायब असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटल्याने एकच खळबळ उडाली आणि कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल पुणे पोलिस विभागाने एका उपनिरीक्षकासह सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. गुडियाला पकडण्यासाठी दुसरी टीम तयार झाली. गुडिया सतत तिचा मोबाईल नंबर आणि लोकेशन बदलत राहिल्याने पोलिसांना तिचा माग काढणे कठीण झाले ज्यात ९ महिने निघून गेले.

डिसेंबरच्या सुरुवातीला, गुडिया बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील थावे भागातील लोहार पट्टी गावात लपल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या खबरींकडून मिळाली. यानंतर पोलीस पथक आपला वेश बदलून लोहार पट्टी गावात पोहोचले. आणि शेतकरी-मजूर असल्याचं भासवत जवळच्या शेतात थांबले.

पोलीस योग्य संधीची वाट पाहत असतानाच १५ डिसेंबरच्या रात्री त्यांना संधी मिळाली. पोलिसांचे पथक गुडिया लपलेल्या ठिकाणी पोहोचले आणि छापा टाकला. यावेळीही गुडियाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला आणि छतावरून उडी मारून पळ काढला. मात्र, पोलिसांचे पथक आधीच सतर्क असल्याने अखेर तिला अटक करण्यात आली.

यावेळी तिला बिहारमधून पुण्यात आणताना पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आणि पुण्यात पोहोचल्यानंतर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सध्या गुडियाला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून. तिच्या टोळीशी संबंधित उर्वरित सदस्यांचा पोलीस आता शोध घेत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

This will close in 21 seconds