अखिलेश शुक्लाला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट; देशमुखांनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याचं नाव फोडलं

कल्याण :- मराठी माणसांविषयी गरळ ओकणारा आणि कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणारा सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला याला शुक्रवारी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर अखिलेश शुक्ला याच्याविरोधात एकापाठोपाठ एक कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन महामंडळाने अखिलेश शुक्ला याची खाजगी गाडी ताब्यात घेतली असून या गाडीला नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
अभिजीत देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेतलं :-
सदर प्रकरणी ज्या मराठी व्यक्तीला मारहाण झाली त्या व्यक्तीचं नाव अभिजीत देशमुख असं आहे. अभिजीत देशमुख यांनी आरोपी अखिलेश शुक्लाकडे पिस्तुल होतं, असा धक्कादायक दावा देखील केला आहे. तसेच पोलीस ठाण्यातही लांडगे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. आम्हाला पहाटे 5 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून घेतलं पण गुन्हा दाखल करून घेतला नाही, असा आरोपही अभिजीत देशमुख यांनी केला आहे.
अखिलेश शुक्लाची गाडी पोलीस ठाण्यात जमा :-
कोणताही अधिकार नसताना गाडीवर अंबरदिवा वापरल्यामुळे दिवा जप्त करून अखिलेश शुक्लाच्या गाडीचा ताबा घेण्यात आला आहे. इन्शुरन्स आणि पीयूसी संपला असतानाही ही गाडी गेली चार वर्ष रस्त्यावर धावत आहे. त्याचप्रमाणे अधिकार नसतानाही बेकायदेशीर रित्या या गाडीमध्ये अंबर दिवा लावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अंबर दिवा जप्त करून गाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.
मुंबई ही मराठी माणसाची- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :-
महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील टॅलेंट येथे येत असते आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक मराठी भाषा उत्तम पणे बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात. मात्र, अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एखाद्याला काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. देशातील वैविध्य टिकले पाहिजे, आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजे मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करणार, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.