७२ जणांकडून पत्नीचा रेप केला, २० हजार अश्लील व्हिडिओ; पतीचा धक्कादायक ‘कारनामा’

फ्रान्स :- फ्रान्सच्या एका कोर्टाने डोमिनिक पेलिको नावाच्या व्यक्तीला जवळपास १० वर्ष त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आहे. डोमिनिक त्याच्या पत्नीला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा. त्यानंतर अनोळखी व्यक्तीला घरात बोलावून त्याच्याकडून पत्नीवर बलात्कार करायला लावत होता. या प्रकरणात कोर्टाने डोमिनिकसह ५० आरोपींवर बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, लैंगिक शोषण या आरोपाखाली दोषी ठरवलं आहे. या घटनेने फ्रान्समध्ये खळबळ माजली आहे.
या घटनेतील पीडित महिला कोर्टाच्या गर्दीत शिक्षा ऐकण्यासाठी हजर होती. ती म्हणाली की, मी एका परफेक्ट मॅरिज रिलेशनशिपमध्ये आहे असं वाटत होते परंतु डोमिनिकने जे माझ्यासोबत केले त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी कोर्ट आणि मीडियाला परवानगी दिली आहे की ते माझी ओळख जगजाहीर करू शकतात कारण मला हे लपवायचं नाहीं. मला इतर महिलांसाठी प्रेरणादायक बनायचं आहे ज्या हे सहन करतात. पीडितेने कोर्टाला माझ्यासोबत जे काही घडले त्याची सुनावणी आणि व्हिडिओ जनता, मीडिया यांच्यात सार्वजनिक करण्यास सांगितले. ज्यातून इतर महिलांना त्यांच्या अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा मिळेल असं त्यांनी म्हटलं.
फ्रान्सच्या दक्षिणेकडील शहर एविग्नन इथं कोर्टात ३ महिने या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. पीडित महिला दर सुनावणीला कोर्टात हजर राहायची. कोर्टाने या प्रकरणात तिच्या पतीला दोषी ठरवल्यानंतर ही महिला कोर्टाबाहेर पडली तेव्हा हजारो लोकांनी तिचं स्वागत केले. ही माझ्यासाठी कठीण परीक्षा होती. मी घेतलेला लढण्याचा निर्णय यावर मला पश्चाताप नाही. यापुढच्या काळात सामुहिकरित्या एकत्रितपणे महिला आणि पुरुष सन्मान, एकमेकांना समजून घेणे यासाठी भविष्यात काम करेन. माझ्या लढाईला ज्यांनी पाठबळ दिले त्यांचे सर्वांचे आभार असं या महिलेने सांगितले.
पीडित महिलेचं ५० वर्षापूर्वी डोमिनिक पेलिको याच्याशी लग्न झाले होते. त्याने स्वतः कोर्टात त्याच्यावर लावलेले आरोप कबूल केले. ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्याला २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टात महिलेच्या पतीसह इतर ४६ जणांना बलात्कारात दोषी, २ जणांना बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी आणि इतर दोघांवर लैंगिक शोषणाबाबत दोषी ठरवलं आहे. या सर्वांनी ३ ते १५ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्व दोषींना वरील कोर्टात अपील करण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे.
नेमकं आहे तरी काय प्रकरण ?
डोमिनिक पेलिको दक्षिण फ्रान्समधील एका शहरात त्याच्या पत्नीसोबत राहत होता. तो वीज विभागात कामाला होता तर त्याची पत्नी एका कंपनीत मॅनेजर होती. १९७३ साली दोघांचे लग्न झाले. त्यांना ३ मुले आहेत. डोमिनिक याला १२ सप्टेंबर २०२० साली महिलांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी अटक करण्यात आली. त्याचा मोबाईल तपासला असता अनेक महिलांचे व्हिडिओ सापडले. त्याच्या घरात रेड टाकली तेव्हा २ फोन, एक कॅमेरा, एक व्हिडिओ रेकॉर्डर आणि लॅपटॉप जप्त केला. डोमिनिक पेलिकाच्या लॅपटॉपमध्ये २० हजाराहून अधिक अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळले. त्यात पत्नीचेही अनेक व्हिडिओ होते. नशेच्या अवस्थेत डोमिनिकने पत्नीवर ७२ परपुरुषांकडून रेप केला होता. त्याचे व्हिडिओ बनवले. यातून पोलिसांनी त्याच्यासह ५० आरोपींना अटक केली होती.