नायलॉन मांजावर बंदी असताना सर्रास विक्री

यवतमाळ :- नायलॉन मांजावर बंदी असताना सर्रास विक्री केली जात आहे. पंधरवड्यापूर्वी एका तरुणाचा गळा चिरल्याची घटना घडली होती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने विक्रेत्यावर कारवाईचा फास आवळत मांजा अप्त केला. मात्र, अजूनही आकाशात उडणाऱ्या पतंगाला नायलॉन मांजाचीच ढील देण्यात येत असून, वर्दळीच्या रस्त्यावर या मांजाची वाहनधारकांत दहशत वाढत चालली आहे.
मकर संक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा आहे. मात्र, डिसेंबर महिन्याच्या प्रारंभापासूनच मुलांत पतंग उडविण्याची स्पर्धा लागली आहे. मुलांची मानसिकता ओळखून विक्रेत्यांनी विविध आकर्षक पतंग व मांजाने आपली दुकाने अंतर्गत सजवून विक्रीस उपलब्ध करून दिले आहे. नायलॉन मांजा हा जिवावर उठणारा ठरत असताना त्याला अटकाव घालण्यात यश आल्याचे दिसत नाही. आतापर्यंत अनेक नागरिकांचा गळा चिरला असून, आकाशात उंच उडणाऱ्या पक्ष्यांचा बळीही या मांजाने घेतला आहे. पालकांकडे आग्रह धरून मुले पतंग उडविण्यासाठी मोकळ्या मैदानात जाऊन उंच आकाशात ढील देतांना दिसून येत आहेत. यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.