शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, या घटनेवर बोलताना म्हणाले की…

नेहमीच राज्याचं राजकारण शरद पवारांच्या भोवती फिरताना दिसतंय. मात्र, यंदाच्या विधानसभेत महायुतीनं महाविकास आघाडीला जोरदार झटका दिलाय. राज्यात महायुतीचं सरकार बसल्यानंतर शरद पवारांच्याही भाजप नेत्यांशी भेटीगाठी वाढल्याचं दिसतंय. त्याला कारण दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन. याच बाबत पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक पाहायला मिळतेय. दिल्लीत होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त, थेट पुण्यातून भीमथडीच्या जत्रेतून शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत चर्चा केली. यावेळी त्यांनी भीमथडी जत्रेचं आमंत्रणही शरद पवारांनी दिलं.
काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेतली होती. साहित्य संमेलनाच्या आमंत्रणासह त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डाळिंबंही भेट दिली होती. दरम्यान मोदी आणि शरद पवार यांच्यात राजकीय बाबींवर स्वतंत्र चर्चा झाल्याचीही माहिती मिळतेय.
यावेळी झालेल्या संवादात शरद पवार यांच्याकडून बीडच्या घटनेचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे. बीडच्या मस्साजोगमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात लक्ष घालून लक्ष घालण्याची विनंती केली. मी काल भेटून आलो, त्याठिकाणी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्या घटनेची सखोल चौकशी करुन न्याय देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असं शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आमंत्रणावर मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय. राज्यात महायुतीचं सरकार आलंय. त्यानंतर शरद पवार यांनी दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट असो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनद्वारे केलेली चर्चा असो. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या घडामाडोंची जोरदार चर्चा सुरू आहे.