सिटी न्यूज चॅनेल :- प्राइम टाइम न्यूज रिपोर्ट

नागपूर :- शुक्रवार, २० डिसेंबर २०२४ रोजी नागपूरच्या प्रेरणा कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली, जिथे 1st ईयरचा विद्यार्थी रियान पठाणवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला कॉलेजच्या बाहेर तलवार आणि दगडांचा वापर करून करण्यात आला. हल्ल्याचा मुख्य आरोपी क्रिश गुप्ता, जो प्रेरणा कॉलेजचाच विद्यार्थी आहे, त्याने आपल्या बाहेरच्या १०-१५ साथीदारांना बोलावून हा हल्ला केला.
हल्ल्याची सुरुवात आठ दिवसांपूर्वी गाडी पार्किंगच्या वादातून झाली होती. रियानने कॉलेजच्या पार्किंगमध्ये गाडी उभी केली होती, तेव्हा क्रिश गुप्ताने त्याला गाडी हलवण्याचा आदेश दिला आणि त्याच्याशी उद्धटपणे वागला. त्यानंतर रियानला धमकी देऊन, आठवड्यानंतर शुक्रवारच्या दिवशी त्याच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला.
हल्ल्यादरम्यान क्रिश गुप्ताने तलवारीने वार केला. रियानने हा वार थोपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे त्याच्या डोक्यावर, हातांवर, आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. रियानचा मित्र जैनुल त्याला वाचवण्यासाठी पुढे आला, पण हल्लेखोरांनी त्यालाही गंभीर मारहाण केली. हल्ल्यावेळी रियानने स्वतःच्या साहसाने हल्लेखोरांच्या हातातील तलवार हिसकावून घेतली, ज्यामुळे हल्लेखोर पळून गेले.
जखमी अवस्थेत, रियान आणि जैनुल पोलिसांकडे गेले, परंतु त्यांना तिथेही अपेक्षित मदत मिळाली नाही. इमामबाडा पोलीस ठाण्यात अधिकारी उपस्थित नव्हते, आणि पोलिसांनी त्यांना स्वतःच मेडिकल करून येण्याचा सल्ला दिला. दोघे मित्र स्वतःच मोटरसायकलवर जाऊन मेडिकल करून आले आणि नंतर FIR दाखल करण्यात आली.
क्रिश गुप्ता आणि त्याच्या साथीदारांविरोधात BNS 118(1), 115(2), 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु आरोपी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्याला केवळ सूचना पत्र देऊन सोडले. १८ वर्ष पूर्ण होण्यासाठी तीन दिवस कमी असल्याचे कारण दिले गेले.
रियानच्या कुटुंबीयांनी नागपूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वसीम खान यांच्याकडे या प्रकरणात मदत मागितली. सोमवारी वसीम खान यांनी रियानच्या कुटुंबासोबत प्रेरणा कॉलेजच्या प्राचार्यांची भेट घेऊन आरोपी क्रिश गुप्ताला निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर ते इमामबाडा पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलिसांना क्रिश गुप्ताच्या इतर साथीदारांचे नाव सांगितले, पण पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.असे सांगण्यात येत आहे की, हल्ल्यानंतरही क्रिश गुप्ता इंस्टाग्रामवर गुंडगिरीचे स्टेटस टाकत आहे, ज्यामुळे रियान आणि जैनुलच्या कुटुंबाला पुन्हा हल्ल्याचा धोका वाटत आहे. वसीम खान यांनी पोलिसांना विचारले की, जर पुन्हा काही घडले, तर त्याला जबाबदार कोण असेल ? . या प्रकरणामुळे नागपूर शहरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉलेज प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.