बापरे भिंत तोडून बँक ऑफ इंडियात चक्क चोरट्यानी केला प्रवेश, वर्धा सावंगी येथील घटना …

वर्धा क्राईम :- सावंगी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुकळी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेची भिंत तोडून चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे सोमवारी सकाळी उजेडात आले आहे. वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दोन ठिकाणी चैन स्नॅचरांनी महिलांना टार्गेट केले. ही घटना ताजी असतानाच आता सुकळीची घटना घडली. चोरट्यांचा हा मनमर्जीचा सपाटा पोलिसांसाठी खुले आव्हान ठरत आहे.
वर्धा शहरातील गांधीनगर येथे आणि बोरगाव मेघे परिसरातील रॉयल मॅरेज हॉल समोर चैन स्नॅचरांच्या टोळीने महिलांना टार्गेट केले. चोरट्यांनी या दोन्ही ठिकाणाहून एकूण ९५ हजरांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ताजी असतानाच रविवारी मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने वध-आर्वी मार्गावरील सुकळी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला टार्गेट केले.
या ठिकाणी चोरटे चोरीच्या प्रयत्नात अपयशी राहिले असले तरी चोरट्यांनी बँकेच्या इमारतीची मागील भिंत तोडून बँकेत प्रवेश मिळविला. पण चोरट्यांनी लॉकरला हाथ लावताच सायरन वाजल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. बँकेची भिंत तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, सावंगीचे ठाणेदार संदीप कापडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
शिवाय स्थानिक गुन्हे शाखेची चमू व श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांच्या चमूने घटनास्थळ गाठून पाहणी केली. बँकेतून कुठलीही रोकड किंवा साहित्य चोरट्यांनी चोरून नेले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असले तरी या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास सावंगी पोलिस करीत आहे.