LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

 बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही ; वाल्मिक कराडच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई :- बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. बीडचे पालकमंत्रिपद कुणाला द्यायचं हे मी, अजितदादा आणि शिंदे साहेब ठरवू अशी माहितीही त्यांनी दिली. बीडचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावे अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप करत आमदार सुरेश धस यांनी केला. देवेंद्र फडणवीसांनी बीडचे पालकमंत्रिपद घ्यावं अशी मागणीही त्यांनी या आधीही केली होती.

बीडप्रकरणी एसआयटीची स्थापना

सरपंच संतोष देशमुख प्रकरणा भाजप आमदार सुरेश धस यांनी नवा खुलासा केला आहे. सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हत्या प्रकरणी लवकरच एसआयटी स्थापन होईल अशी माहिती दिली. एसआयटीमध्ये कोण असणार हे माहिती नाही, पण त्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही झाल्याची माहिती आपल्याला त्यांच्या सचिवांनी दिली असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला.

बीडचा ‘आका’ हाच 302 चा प्रमुख सूत्रधार असून तो लवकरात लवकर आत गेला पाहिजे असंही धस यांनी म्हटलं. वाल्मिक कराडचा संबंध खंडणी प्रकरणाशी असल्याचं आधी मला वाटत होतं. पण या हत्याकांडांचा प्रमुख सूत्रधार तोच असल्याचं माझं मत आहे असं सुरेश धस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रिपद स्वीकारावं

मुख्यमंत्र्यांनी किंवा दोन्हीपैकी एका उपमुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं असा सल्ला आमदार सुरेश धस यांनी दिला. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. या आधीच्या पालकमंत्र्यांनी त्यांचे पालकमंत्रिपद आणि मंत्रिपद हे भाड्याने दिलं होतं असा आरोपही त्यांनी केला.

वाल्मिक कराडला सरकारकडून संरक्षण, अंजली दमानियांचा आरोप

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेचे निकटवर्तीय, वाल्मिक कराडांचं नाव विरोधकांकडून वारंवार उपस्थित केलं जातंय. वाल्मिक कराडला सरकारमधूनच संरक्षण मिळत असल्याचाही आरोप होत असून त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जात आहे. खुद्द धनंजय मुंडेंनी यासंदर्भातील आरोप फेटाळले आहेत. आता यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी मोठा दावा केलाय.

अंजली दमानिया यांनी जगमित्र शुगर्सचे 6 सातबारे असलेले कागद सादर करत, त्या सात बारावर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची नावं एकत्र असल्याचा दावा केला. परळीमध्ये वाल्मिक कराडवर अनेक गुन्हे दाखल असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!