आदिवासी विकास मंत्री प्रा. डॅा. अशोक उईके यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनच आंदोलन मागे

यवतमाळ :- पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आदिवासी विकास मंत्री प्रा. डॅा. अशोक उईके यांनी भेट दिली. मंत्री उईके यांच्या भेटीमुळे आंदोलनात सकारात्मक बदल झाला असून विद्यार्थ्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
मागील तीन दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आपल्या मूलभूत मागण्यांसाठी पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलनाला बसले होते, यवतमाळ आमचे प्रतिनिधि दुर्गेश कान्हु यांनी दिलेल्या माहितीनुसार आदिवासी विकास मंत्री प्रा. डॅा. अशोक उईके यांनी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्यांना समजून घेत, त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली प्रमुख मागणी मांडली, ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक महागाई दरानुसार प्रत्येकवर्षी आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हास्तरीय मुला-मुलींच्या वसतिगृहांमध्ये लागू असलेल्या डीबीटी योजनेमध्ये महागाई दरानुसार वाढ करण्यात यावी. तसेच, वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या मुला-मुलींची वसतिगृहात उपस्थिती किमान 85 टक्के असावी, आणि 60 दिवसांहून अधिक वेळ गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेश रद्द केला जावा अशी मागणी केली होती.
प्रा. डॅा. उईके यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या गंभीरपणे ऐकल्या आणि त्यावर सकारात्मक चर्चा केली. तसेच त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहचवून त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवणार असल्याचे आश्वासनही आदिवासी विकास मंत्री उईके यांनी दिले, तसेच तुम्ही माझे आहात, माझी जबाबदारी आहात असंही मंत्री उइके म्हणाले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री उईके यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला एक सकारात्मक व प्रभावी मार्ग मिळाला आणि सर्वांनी एकत्र येऊन यशस्वी आंदोलनाची समाप्ती केली. अशाच सर्व अपडेटस् साठी बघत रहा सिटी न्यूज.