LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

फडणवीस मुख्यमंत्री होताच महाराष्ट्रात ३७ व्या जिल्ह्याची निर्मिती ?

नांदेड :- देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रात आणखी एका जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. लातूरमधील उदगीर या जिल्ह्याची नव्याने निर्मिती होणार असा मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. येत्या २६ जानेवारी रोजी उदगीर जिल्हा निर्मितीची घोषणा होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र या अफवेत काहीही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

उदगीर जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार आणि मुखेड तालुक्यातील काही गावांचा समावेश होणार असल्याचे फेक मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. या चर्चांमुळे मुखेड, लोहा आणि कंधार तालुक्यातील जनतेची धाकधूक वाढली होती. या मेसेजमुळे उलटसुलट चर्चांनाही उधाण आले होते. मात्र हा मेसेज साफ खोटा असल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले आहे.

प्रजासत्ताक दिनी घोषणेची फेक माहिती

राज्यात काही जिल्ह्यांचे विभाजन करुन नवीन जिल्हा होणार असल्याची चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र अद्यापही याबाबत शासनाकडून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच २६ जानेवारी रोजी लातूर मधील उदगीर या नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर उदगीर जिल्हा निर्मिती होणार असल्याचा मेसेज देखील तुफान व्हायरल होत आहे.

काय होते फेक मेसेज ?

नव्याने निर्मिती होणाऱ्या उदगीर जिल्ह्यामध्ये उदगीर, अहमदपूर, देवणी, जळकोट, बाऱ्हाळी याशिवाय नांदेड जिल्ह्यातील मुखेड, लोहा आणि कंधार या तीन तालुक्यांचा समावेश होणार आहे असे फेक व्हायरल मेसेजमध्ये होते. मुखेड, लोहा आणि कंधार या तालुक्यांचा उदगीर जिल्ह्यात समावेश होणार असल्याच्या मेसेजमुळे विविध चर्चाना उधाण आले होते.

प्रशासकीय स्तरावर कुठलीही हालचाल नाही

उदगीर जिल्हा निर्मितीबाबत मंत्रालय स्तरावर किंवा प्रशासकीय स्तरावर कुठल्याही हालचाली सुरु नाहीत असे दिसून येत आहे. एखादा नवीन जिल्हा निर्मिती करायचा असेल तर त्यासाठी हरकती, सूचना मागवल्या जातात. मंत्रिमंडळात त्यावर निर्णय होतो. जिल्हा निर्मितीसाठी मोठी प्रक्रिया असते. पण अशी कुठलीही प्रक्रिया सध्या सुरु नाही. कुठलीही शहानिशा न करता हा मेसेज फॉरवर्ड केला जातोय. त्यामुळे उदगीर जिल्हा निर्मिती बाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मॅसेज खोटा असल्याचं दिसून येत आहे.

लोहा आणि कंधार हा लातूर लोकसभा क्षेत्रात येत असला तरी उदगीर जिल्हा निर्मिती बाबतचा मेसेज आणि बातमी खोटी असल्याचं आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. लातूर हा नव्याने जिल्हा झाला आहे. जर उदगीर जिल्हा होणार असेल तर आम्हाला काही हरकत नाही आणि नांदेड जिल्ह्यातील एकही गाव इतर जिल्ह्यामध्ये जाणार नसल्याचे चिखलीकर म्हणाले.

शासनाला वाटत असेल तर नांदेड जिल्ह्यातच जिल्हा निर्मिती करावी आणि नागरिकांच्या संमतीने निर्णय घ्यावा असा सल्ला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलाय. उदगीर जिल्हा निर्मिती होणार असल्याच्या खोटा मेसेज पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये असे आवाहन आमदार चिखलीकर यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!